सुशांतसिंह राजपूतचा भाऊ 15 हजार मतांनी आघाडीवर - brother of Sushantsinh leading by 15 thousand votes in Bihar election | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंह राजपूतचा भाऊ 15 हजार मतांनी आघाडीवर

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

हा भाऊ आमदारकीची हॅटट्रीक करण्याच्या मार्गावर 

पाटणा : बिहारामधील छातापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचे चुलतबंधू नीरज बबलू हे उभे असून राजदच्या विपीन सिंह यांचे त्यांना आव्हान आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत नीरद बबलू हे 15 हजारहून अधिक मतांनी आघाडीवर होते.

नीरज यांनी २०१५ मध्ये देखील या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. यानंतर त्यांचा मतदारसंघ बराच चर्चेत आला होता.  तेथूनच सुशांतसिंह  याच्या आत्महत्येचा मुद्दा राजकीय पटलावर चर्चेला आला. तो इतका वाढला की बिहारच्या निवडणुकीची घोषणा होण्याआधी त्यावर राजकारण खेळले गेले. 

नीरज बबलू हे आता आपल्या आमदारकीची हॅटट्रीक करण्याची शक्यता आहे. २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नीरज बबलू यांनी भाजपच्या तिकिटावर लढताना राजदच्या जहूर आलम यांचा ९ हजार मतांनी पराभव केला होता. त्याआधी २०१० मध्ये जदयूच्या तिकिटावर लढताना त्यांनी अकील अहमद यांचा २३ हजार मतांनी पराभव केला होता.

बिहार विधानसभा निवडणुकीतील निकालाची रंगत आणि चुरस वाढत आहे. दुपारी चारपर्यंत भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही बहुमताच्या दिशेन, असे चित्र असले तरी अधिकृत निकाल लागेपर्यंत अनेक घडामोडी होणार आहेत. त्यात अनेक उमेदवारांच्या मतांमध्ये फारच कमी फरक आहे. त्यामुळे पारडे कधीही बदलेल, अशी शक्यता आहे. 

त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाने आपल्या कार्यकर्त्यांना मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. `हम सभी क्षेत्रों के उम्मीदवारों और कार्यकर्ताओं से संपर्क में है और सभी जिलों से प्राप्त सूचना हमारे पक्ष में है। देर रात तक गणना होगी। महागठबंधन की सरकार सुनिश्चित है। बिहार ने बदलाव कर दिया है। सभी प्रत्याशी और काउंटिंग एजेंट मतगणना पूरी होने तक काउंटिंग हॉल में बने रहें।` असे पक्षाने म्हटले आहे. यामुळे तेजस्वी यादव यांना अद्याप विजयाचा विश्वास असल्याचे दिसून येत आहे.

भाजप हा राज्यात सध्या सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. एनडीए आघाडीवर असली तरी निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास विलंब होत असल्याने कोणताही राजकीय पक्ष अद्याप जल्लोष करताना दिसत नाही. मतमोजणीला विलंब होण्याचे कारण कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख