
Brij Bhushan Singh News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याला कडाडून विरोध केल्यानंतर भाजप खासदार व अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेलाही सिंह यांनी हजेरी लावली होती. आता याच बृजभूषण सिंहांवर महिला पैलवानांनी गंभीर आरोप केले आहेत.
दिल्लीतील जंतरमंतर येथे देशातील अनेक मल्लांनी आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनात टोकियो ऑलम्पिकमध्ये पदक जिंकणारा बजरंग पुनिया आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगाट, साक्षी मलिक यांच्यासह देशातील अनेक मल्ल सहभागी झाले आहेत.
या आंदोलनकर्ते म्हणाले, महिला पैलवानांचे प्रशिक्षकांकडून शोषण केले जाते. त्यामुळे आम्ही या अत्याचाराविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढणार असून बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांना पदावरुन दूर करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
कुस्ती महासंघ आमच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करतो. आम्हाला छळण्याचा प्रयत्न केला जातो. आमचे शोषण केले जात आहे. आम्ही जेव्हा ऑलिम्पिकसाठी बाहेर गेलो तेव्हा आम्हाला फिजियो कोच दिला गेला नाही. जेव्हा आम्ही याविरोधात आवाज उचलतो, तेव्हा आम्हाला धमकी देवून शांत केले जाते असाही आरोप यावेळी केला आहे.
विनेश फोगाट म्हणाली, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यासह काही जवळचे प्रशिक्षक महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करतात. सिंह यांनी टोकयो ऑलिम्पिकमध्ये जेव्हा मी पराभूत झाले तेव्हा मला ‘खोटा शिक्का’असल्याचा शिक्का मारला. त्यांनी माझं मानसिक खच्चीकरण केलं. मी रोज मला स्वतःला संपविण्याचा विचार करत होते.. जर आमच्यापैकी एकाही मल्लाचं काही झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी बृजभूषण सिंह यांची असणार आहे.
कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या प्रकऱणी माहिती देणार आहोत. बृजभूषण सिंह यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं जावं. खूप दिवसांपासून खेळाडूंवर अत्याचार होत आहेत. महिला सुरक्षित नाही म्हणून बसलो आहोत. येणाऱ्या काळात सर्व सुरक्षित होणार आहे. सर्व तपास झाला तरी सगळं समोर येईल. मी १८ वर्षापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. आम्ही या ठिकाणी हंगामा करायला आलो नाहीत असेही मलिक यांनी यावेळी सांगितले.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी घेतली कुस्तीपटू महिलांची भेट घेतली आहे. या महिला खेळाडूंच्या गंभीर आऱोपांची दखल घेत दिल्ली पोलिसांना त्यांनी नोटीस पाठवली आहे. भले ते खासदार असो अगोदर बृजभूषण च्या विरोधात FIR रजिस्टर करा त्यांना अटक करा. ते कोणी खास नाही त्यांच्यावर इतरांप्रमाणे कारवाई व्हावी अशा सूचना मालिवाल यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
लैंगिक शोषणाच्या आरोपावर बृजभूषण सिंह म्हणाले...
महिला पैलवानांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना बृजभूषण सिंह म्हणाले,माझ्यावर करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप हे गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. माझं स्वतःचं यामध्ये नाव आल्यानं मी याप्रकरणी कारवाई कशी करु शकतो? मी याप्रकरणी चौकशीसाठी तयार असल्याचंही सांगितलं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.