बोम्मई दिल्लीत मोदी, शहांच्या भेटीला! येडियुरप्पा म्हणाले, ढवळाढवळ करणार नाही!

बोम्मई हे येडियुरप्पा यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळं बोम्मई यांची निवड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.
बोम्मई दिल्लीत मोदी, शहांच्या भेटीला! येडियुरप्पा म्हणाले, ढवळाढवळ करणार नाही!
Bommai is completely free to choose his ministers says B S Yediyurrapa

नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी पहिला दिल्ली दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर बोम्मई यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळात येडियुरप्पा यांचेच वर्चस्व राहील, अशी चर्चा आहे. (Basavraj Bommai is completely free to choose his ministers says B S Yediyurrapa)

येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात बोम्मई हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा भार होता. तसेच बोम्मई हे येडियुरप्पा यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळं बोम्मई यांची निवड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. बोम्मई यांच्या निवडीत येडियुरप्पा यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तारातही येडियुरप्पा यांचाच वरचष्मा राहील, असे बोलले जात होते. 

पण बोम्मई यांच्या दिल्ली दौऱ्यादिवशीच येडियुरप्पा यांनी स्पष्ट शब्दांत खुलासा केला आहे. नव्या मंत्रिमंडळात मंत्र्यांच्या निवडीत कोणतीही ढवळाढवळ करणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. मी आता पक्ष मजबूत करण्यासाठी काम करेल. पक्ष श्रेष्ठींच्या सल्ल्याने आपली टीम निवडण्यासाठी ते मुक्त आहेत. बोम्मई आज दिल्लीत आहेत. काही दिवसांत ते केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून कॅबिनेटबाबत निर्णय घेतील. कोणाला मंत्री करायचे किंवा नाही, याबाबत मी काही सांगणार नाही, असे येडियुरप्पा म्हणाले.

येडियुरप्पा यांनी बोम्मई यांना चांगले काम करण्याचा सल्लाही दिला. बोम्मई यांनी शपथ घेतल्यानंतर गरीबांना मदत करण्यावर भर असेल, असे सांगितले आहे. दरम्यान, बोम्मई हे त्यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. तसेच त्यांच्याकडं कायदा, संसदीय कार्य ही खातीही होती. 61 वर्षांचे बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे वर्चस्व विचारात घेऊन भाजपने याच समाजातील बोम्मई यांना पुढे आणले आहे. 

बोम्मई यांनी 2008 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची पक्षातील वाटचाल सुरू झाली. ते व्यवसायाने अभियंते असून दोन वेळा विधानपरिषदेचे आमदार तर तिन वेळा शिगांव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहे. कर्नाटक विधीमंडळात पक्षाचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in