अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, नाविका कुमार अन् राहुल शिवशंकर अडचणीत - bollywood producers file case against news channels for smearing campaign | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, नाविका कुमार अन् राहुल शिवशंकर अडचणीत

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. या प्रकरणी बॉलीवू़डला लक्ष्य करणाऱ्या वृत्तवाहिन्या आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलीवूडची बदनामी करणे रिपब्लिक टीव्ही आणि टाईम्स नाऊ या वृत्तवाहिन्यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. सुशांत मृत्यू प्रकरणी बॉलीवूड कलाकारांची मीडिया ट्रायल घेतल्याप्रकरणी रिपब्लिकचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी, पत्रकार प्रदीप भंडारी आणि टाईम्स नाऊचे मुख्य संपादक राहुल शिवशंकर, पत्रकार नाविका कुमार यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. 

बॉलीवूडमधील 38 निर्मात्यांनी हा खटला दाखल केला आहे. यात आमीर खान, शाहरुख खान, सलमान खान, करण जोहर, अजय देवगण, अनिल कपूर, रोहित शेट्टी यांच्या चित्रपट निर्मिती कंपन्यांसह यश राज फिल्म्स आणि आर.एस, एंटरटेन्मेंट यांचा समावेश आहे. डीएसके लीगल या कंपनीच्या वतीने हा खटला उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. चित्रपट क्षेत्रातील संघटनांचाही या खटल्यात समावेश आहे. 

रिपब्लिक टीव्ही आणि टाईम्स नाऊ या वृत्तवाहिन्यांचे बेजबाबदार, बदनामीकारक आणि अवमानजनक वृत्तांकन थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या वृत्तवाहिन्यांनी बॉलीवूड ड्रग्ज माफिया असे म्हणून चित्रपट क्षेत्रातील कलाकारांची बदनामी केली आहे. बॉलीवूडमधील कलाकारांच्या मीडिया ट्रायल या वृत्तवाहिन्यांवर करण्यात आल्या. याचबरोबर कलाकारांच्या खासगीपणाच्या हक्कावर त्यांनी गदा आणली, असेही नमूद करण्यात आले आहे. 

या वृत्तवाहिन्यांवर बॉलीवूडच्या बदनामीची मोहीम चालवण्यात आली. यामुळे बॉलीवूडवर अवलंबून असलेल्या अनेकांच्या चरितार्थावर परिणाम झालेला आहे. कोरोना संकटाच्या काळात चित्रपटसृष्टी अडचणीत असताना आणखी मोठे नुकसान या वृत्तवाहिन्यांनी केले. संपूर्ण बॉलीवूड हे गुन्हेगार असून, सगळीकडे ड्रग्ज संस्कृती असल्याची बदनामी त्यांनी केली, असे खटल्यात म्हटले आहे. 

रियावर आरोप करणाऱ्या सगळ्यांची सीबीआय करेल चौकशी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृत्यू होण्याच्या एक दिवस आधी रिया चक्रवर्ती त्याला भेटली होती, असा दावा रियाच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने केला होता. मात्र, केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीत या शेजारी महिलेने घूमजाव केले आहे. अखेर सीबीआयने त्या महिलेला तंबी देऊन सोडून दिले आहे. रिया चक्रवर्ती हिच्याबद्दल खोटे दावे करणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याचा इशारा तिचे वकील सतिश मानेशिंदे यांनी दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख