भाजप कार्यकर्ते ट्रम्प यांच्या प्रचारात जाऊ शकतात पण पक्षाने घातल्या या अटी - BJP workers can go for campaign of Trump but with these conditions | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप कार्यकर्ते ट्रम्प यांच्या प्रचारात जाऊ शकतात पण पक्षाने घातल्या या अटी

मंगेश वैशंपायन
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

भाजपच्या "फ्रेंडस ऑफ बीजेपी' शाखेची अमेरिकेतील अनेक राज्यांत मोठी संपर्कसूत्रे आहेत. या शाखेच्या सदस्यांची संख्याही लक्षणीय आहे. ट्रम्प व मोदी यांच्यातील मैत्रीही सर्वश्रुत आहे. मात्र हा धागा पकडून तेथील प्रचारात भाजपचे नाव थेटपणे वापरले जात असल्याचे व अनेकदा पक्षाच्या दोनरंगी झेंड्याचाही वापर होत असल्याचे अहवाल चौथाईवाले यांना मिळाले.

नवी दिल्ली ः अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेथे स्थायिक झालेले भाजप कार्यकर्ते व मित्रांनी सत्तारूढ पक्षाचे नाव प्रचारात वापरू नये, अशी तंबी भाजपने दिली आहे. पक्षाच्या सागरपार शाखेचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी त्याबाबतचे पत्र अमेरिकेतील सर्व अनिवासी भारतीय भाजप कार्यकर्त्यांना लिहीले आहे. याबाबतचे मेल त्यांनी तेथील सर्व भाजप पदाधिकाऱ्यांना पाठविले आहेत.

अमेरिकन उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला कमला हॅरीस यांच्या उमेदवारीबद्दल चौथाईवाले म्हणाले की अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदासाठी भारतीय वंशाच्या उमेदवार असणे हे आनंददायी आहे. 
येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत वर्तमान अध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प व रिपब्लिकन पक्षाचे ज्यो बिडेन यांच्यातील लढतीमध्ये रंगत येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र म्हणविणारे ट्रम्प यांच्यासमोर ज्यो बिडेन यांनी हॅरीस यांच्या उमेदवारीचा पत्ता फेकला आहे.

भाजपच्या "फ्रेंडस ऑफ बीजेपी' शाखेची अमेरिकेतील अनेक राज्यांत मोठी संपर्कसूत्रे आहेत. या शाखेच्या सदस्यांची संख्याही लक्षणीय आहे. ट्रम्प व मोदी यांच्यातील मैत्रीही सर्वश्रुत आहे. मात्र हा धागा पकडून तेथील प्रचारात भाजपचे नाव थेटपणे वापरले जात असल्याचे व अनेकदा पक्षाच्या दोनरंगी झेंड्याचाही वापर होत असल्याचे अहवाल चौथाईवाले यांना मिळाले. यामुळे अमेरिकेतील प्रचारात भारत एकाच बाजूकडे झुकल्याचे चित्र निर्माण होण्याचा धोका दिसत आहे व तेथील सध्याची परिस्थिती पाहता भारताला असा धोका घेणे परवडणारे नाही, असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे.त्या पार्श्‍वभूमीवर चौथाईवाले यांनी भाजप व सरकारच्या सर्वेसर्वा नेतृत्वाकडे संपर्क साधून अमेरिकेतील भाजप-मित्रांना याबाबतची तंबी देणारी सूचनापत्रे पाठविल्याचे समजते. 

रिपब्लिकन पक्षाने ट्रम्प यांच्या प्रचारमोहीमेसाठी गतवर्षी सप्टेंबरमध्ये केलेल्या "हाऊडी मोदी' कार्यक्रमात भारताच्या पंतप्रधानांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता . "अबकी बार ट्रम्प सरकार' अशी घोषणाही त्या कार्यक्रमात दिली गेली होती. त्यानंतर यंदा फेर्बुवारीत म्हणजे भारतात कोरोना कहर सुरू होण्याच्या अगदी तोंडावर अहमदाबादमध्ये झालेल्या "नमस्ते ट्रम्प' मेळाव्याला लाखोंची उपस्थिती होती. 

चौथाईवाले यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या निवडणूक प्रचारात तेथील भाजप कार्यकर्ते जरूर सहभागी होऊ शकतात कारण ते त्या देशाचे नागरिक आहेत. ते व्यक्तिगतरीत्या निवडणुकीच्या रिंगणातील कोणत्याही उमेदवाराचा प्रचारही करू शकतात. मात्र त्या प्रचारात ते भाजप हे नाव, किंवा पक्षाचे चिन्ह-झेंडा वापरू शकत नाहीत, तसे त्यांनी करू नये. भारत व अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध अत्यंत घनिष्ठ आहेत व त्यांना दोन्ही बाजूंचे समर्थनही वेळोवेळी मिळत गेले आहे. हे संबंध पक्षातीत आहेत किंबहुना तसेच ते असावेतभारत व अमेरिकेतील मैत्रीसंबंध भविष्यातही कायम राहतील असेही त्यांनी नमूद केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख