भाजपमध्ये जाऊन चूक झाली, आम्हाला परत घ्या! घरवापसीसाठी पदाधिकाऱ्यांचे आंदोलन - bjp wokers stage protest in front of tmc office for entry in tmc | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

भाजपमध्ये जाऊन चूक झाली, आम्हाला परत घ्या! घरवापसीसाठी पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

वृत्तसंस्था
सोमवार, 14 जून 2021

पश्चिम बंगालमधील पराभवानंतर भाजपला गळती लागली आहे. भाजप नेते आणि पदाधिकारी तृणमूल काँग्रेसमध्ये परतू लागले आहेत. 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) पराभवानंतर राज्यातील भाजपला (BJP) गळती लागली आहे. बीरभूम येथील तृणमूल काँग्रेसच्या (TMC) 50 पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता घरवापसीसाठी त्यांनी तृणमूलच्या कार्यालायसमोर चक्क धरणे धरले. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळून ते पुन्हा पक्षात आले आहेत. 

विधानसभा निवडणुकीआधी तृणमूलचे अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर हे नेते आणि पदाधिकारी तृणमूलमध्ये परतू लागले आहेत. बीरभूम जिल्ह्यातील भाजपच्या 50 पदाधिकाऱ्यांनी आज तृणमूलच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केल्याचे अनोखे चित्र आज दिसले. या पदाधिकाऱ्यांच्या हातात फलक होते. आमची चूक झाली, आम्हाला पक्षात परत घ्या, असे या फलकांवर लिहिले होते. 

हे पदाधिकारी मागील काही दिवसांपासून तृणमूलमध्ये परत येण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी धरणे आंदोलनाचा मार्ग पत्करला. अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश आले आणि त्यांचा पक्षात प्रवेश झाला. विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश करून चूक केल्याची कबुली त्यांनी दिली. यापुढे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी काम करु, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर तृणमूलमध्ये परतणारे नेते आणि पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

हेही वाचा : पुतण्याच्या विरोधात बंड अन् गायले नितीशकुमारांचे गोडवे 

नुकतेच भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार मुकुल रॉय हे तृणमूलमध्ये परतले आहेत. मागील काही आठवड्यांपासून रॉय यांच्या घरवापसीची चर्चा होती. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नुकतीच पक्षाची बैठक कोलकत्यात बोलावली होती. या बैठकीला रॉय यांनी दांडी मारली. रॉय यांनी ममतांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. नंतर ममता आणि त्यांचे भाचे व तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय आणि त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांचा पक्षप्रवेश झाला होता. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमज्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश होता. भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली होती. भाजपमध्ये ते बाजूला फेकले गेले असून, ते नाराज असल्याचेही बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली होती.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख