भाजपच्या किमान 75 विद्यमान आमदारांचे तिकिट कापले जाणार?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचीतयारी भाजपने सुरू केली आहे.
भाजपच्या किमान 75 विद्यमान आमदारांचे तिकिट कापले जाणार?
bjp will cut tickets of current mlas in uttar pradesh

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तयारी भाजपने (BJP) सुरू केली आहे. पक्ष नेतृत्वाने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आताच तिकीट वाटपाची चाचपणीही सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत समाधानकारक कामगिरी न केलेल्या किमान 75 आमदारांचे तिकिट कापले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मागील दोन दिवस उत्तर प्रदेशातील भाजप खासदारांशी चर्चा केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री या वेळी हजर होते. वाराणसीतून लोकसभेवर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा काल काही काळ व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाल्याचे समजते. कोरोनाच्या दुसऱया लाटेत नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघांत जन आशीर्वाद यात्रा काढण्यास सांगण्यात आले आहे. सातत्याने जनतेच्या संपर्कात राहा, असे खासदारांसह आमदारांना बजावण्यात आले आहे. 

भाजपने उत्तर प्रदेशात नुकतेच एका खासगी संस्थेकडून भाजपच्या 305 आमदारांच्या कामगिरीचे सर्वेक्षण केले. या खासगी संस्थेने प्रत्येक मतदारसंघात जाऊन नागरिकांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया नोंदवल्या. उत्तर प्रदेश केवळ पुढील 2022 च्या  विधानसभा निवडणुकीसाठी नव्हे तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीही कळीचे राज्य आहे. यामुळे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणताही धोका स्वीकारण्यास तयार नाही. आमदारांच्या कामगिरीबद्दल संघा परिवारानेही वेगळा फीडबॅक घेतला आहे. 

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीही सातत्याने आमदारांशी चर्चा करून विकासकामांचा आढावा घेतला आहे. या सर्व मूल्यमापनानंतर सुमारे 50 ते 75 आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. आमदारांचे हे रिपोर्ट कार्ड काटेकोरपणे व त्यांच्या कामगिरीच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. यात व्यक्तिगत भाग नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

जनतेशी संपर्क नाही अशा आमदारांवर स्पष्टपणे टांगती तलवार आहे. मतदारांशी उध्दटपणे वागणारे, मोदी व योगी सरकारचा प्रभावी प्रचार न करणारे, जनतेची कामे न करणारे तसेच भाजप कार्यकर्ते व संघपरिवारात प्रतिमा चांगली नसलेले आमदार यात आहेत. कानपूर-बुंदेलखंड भागातील 52 पैकी 47 जागा भाजपकडे आहेत. यातील सुमारे 25 आमदारांची तिकीटे धोक्यात असल्याची माहिती आहे. पक्षाच्या प्रतिमेवर प्रतीकूल परिणाम करणाऱ्या आमदारांना  माफ करण्याच्या भूमिकेत दिल्लीचे नेतृत्व नाही. तिकीटे कापल्यावर बंडखोरी होणार हेही पक्षनेतृत्वाने गृहीत धरले आहे. या दृष्टीने पक्षाने तयारी सुरू केली आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.  

उत्तर प्रदेशातील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप नेतृत्वाला कठोर निर्णय घेणे भाग पडणार आहे. ज्यांच्या कामगिरीबद्दल प्रतीकूल फीडबॅक आले आहेत त्या भाजप आमदारांवर टांगती तलवार राहणे स्वाभाविक आहे.
- सईद अन्सारी (ज्येष्ठ पत्रकार, दिल्ली)

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in