कर्नाटकात निवडणुकांचा हंगाम : भाजपमध्ये बदलाच्या हालचाली!

सध्याच्या वातावरणाचा राजकीय लाभ उठवण्यासाठी मुदतपूर्व निवडणुका घेतल्यास लाभ होईल अशी चर्चा जोर धरु लागली आहे.
कर्नाटकात निवडणुकांचा हंगाम : भाजपमध्ये बदलाच्या हालचाली!
BJPsarkarnama

सोलापूर : कर्नाटक (Karnataka) राज्यातील राजकीय उलथापालथीसाठी जून महिना मोक्याचा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यातील भाजप (BJP) सरकारची पुढील वाटचाल जूनअखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर राज्यातील तापलेल्या वातावरणाने सर्वच पक्षात हालचालींना वेग येऊ लागला आहे. त्यातच विधान परिषदेसाठी भाजपचे चार, काँग्रेस दोन आणि धर्मनिरपेक्ष‍ जनता दलाचा एक उमेदवार बिनविरोध निवडूण आला आहे. इच्छुक असलेल्या माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांना उमेदवारी नाकारल्याने तापलेल्या वातावरणात भरच पडली आहे. तर राज्यसभेच्या चार जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. (BJP Testing for early Karnataka Assembly elections)

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या ते कर्नाटकातूनच राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांनाच पुन्हा उमेदवारीची संधी देण्याचे ‘फायनल' केले आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार कर्नाटकातून भारतीय जनता पक्ष दोन, तर काँग्रेस एक जागा सहज जिंकू शकते. पण चौथ्या जागेसाठी काँग्रेसला धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या पाठिंब्याची आवश्‍यकता भासणार आहे. सध्या त्यासाठी काँग्रेसच्या गोटातून डावपेच आखले जात आहेत. दरम्यान, माजी मंत्री रमेश हे राज्यसभेसाठी सोमवारी (ता. ३० मे) अर्ज दाखल करणार आहेत.

BJP
किंगमेकर सुरेश हसापुरे भविष्यात आमदार बनतील : माजी मंत्री म्हेत्रेंची भविष्यवाणी

गुजरात व हिमाचल प्रदेशातील वर्षअखेर होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर कर्नाटकातील राजकीय वातावरणाची नांदी काय असेल याचा अंदाज घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या समन्वय समितीची बैठक झाली. राज्यातील राजकीय वातावरणाबाबत सखोल चर्चा होऊन विधानसभेच्या निवडणुका कधी घेतल्यास पक्षास फायदा होईल, या संदर्भातही यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. सध्याच्या वातावरणाचा राजकीय लाभ उठवण्यासाठी मुदतपूर्व निवडणुका घेतल्यास लाभ होई, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. सध्या कर्नाटकात भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार पाटील व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कार्यशैलीबाबत पक्षांतर्गत मतभेद आहेत. बोम्मई लिंगायत समाजाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने त्यांना दुखावण्याच्या मनस्थितीत सध्या पक्ष नाही. केंद्रीय समितीत याबाबत समझोता करण्यात आला. दरम्यान, मंत्रिमंडळातील बदलाबाबतही काही निर्णय अपेक्षित आहेत. काही नव्या चेहऱ्यांना थोड्या कालावधीकरिता का होईना संधी देऊन बेरजेच्या राजकारणाचा पक्षात विचार सुरु आहे.

BJP
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद मिळूनही सोलापूरची पाण्याची काय अवस्था? : अजितदादांचा शिंदे-मोहितेंना टोला

विधान परिषदेनंतर पुढील महिन्यात राज्यसभा तसेच तालुका व जिल्हा पंचायत आणि त्यानंतर बंगळूर महापालिकेची निवडणूक होत आहे. राजकीय उलथापालथीसाठी हा कालावधी मोठा सकस मानला जात असल्याने सर्वच राजकीय पक्षात हालचाली वाढू लागल्या आहेत. कर्नाटक विधानसभेची मुदत पुढील वर्षातील मे महिन्यात संपणार आहे. परंतु मुदतपूर्व निवडणुका घेतल्यास पक्षास फायदा होईल, असे काही राजकीय धुरिणांना वाटत आहे. त्यामुळे विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक लागल्यास आश्‍चर्य वाटायला नको. भारतीय जनता पक्षाने ऑपरेशन कमळच्या माध्यमातून कर्नाटकातील सत्ता हस्तगत केली आहे.

BJP
पाया पडायला आलेल्या कार्यकर्त्याला आमदार राजेंद्र राऊतांची भरस्टेजवर मारहाण

विधान परिषदेच्या निवडी बिनविरोध

कर्नाटक विधान परिषदेच्या सात जागांसाठी ३ जूनला मतदान होणार होते. परंतु भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, पक्षाचे राज्य सचिव हेमलता नायक, एस. केशवप्रसाद व नारायणस्वामी चलवादी, काँग्रेसतर्फे बंगळूरचे माजी महापौर एम. नागराजू यादव, अल्पसंख्याक सेलचे अब्दुल जब्बार तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या वतीने टी. ए. सरवन हे बिनविरोध निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे चिरंजीव विजयेंद्र यांना उमेदवारी देण्याची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश समितीने शिफारस केली होती. परंतु त्यांच्या उमेदवारीस केंद्रीय पातळीवर नकार दिल्याने येडीयुरप्पा गटात नाराजीचा सूर आहे. विजयेंद्र यांच्या उमेदवारीचा विधानसभेसाठी विचार करण्याचा शब्द पक्षाने दिला असला तरी येडीयुरप्पा मात्र मुलाच्या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी आग्रही होते.

विधानसभेतील पक्षीय बलाबल

एकूण जागा २२४

भाजप (अपक्ष १) - १२१

काँग्रेस (अपक्ष १) - ६९

जनता दल (धर्मनिरपेक्ष) ३२

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in