रुडी अन् शाहनवाज प्रकरणी भाजप 'बॅकफूट'वर

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने बिहारमध्ये प्रचारासाठी 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यावरुन वाद निर्माण झाला आहे.
bjp says star campaigner list is updated according to election schedule
bjp says star campaigner list is updated according to election schedule

नवी दिल्ली : बिहार  विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यात पंतपप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह 30 नेत्यांचा समावेश आहे. मात्र, या यादीतून गेली अनेक वर्षे पक्षाचा चेहरा असलेले खासदार राजीव प्रताप रूडी व शाहनवाज हुसेन यांची नावे गायब झाली आहेत. यावरुन मोठा गदारोळ झाल्याने भाजप अखेर 'बॅकफूट'वर गेल्याचे चित्र आहे. 

मूळचे बिहारमधील असलेले आणि राष्ट्रीय स्तरावर छाप पाडणाऱ्या नेत्यांनाच भाजपने डावलल्याने पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बिहारच्या कोणत्याही निवडणुकीत भाजप प्रचारकांच्या यादी इतर नेत्यांची नावे बदलत मात्र,  रुडी आणि शाहनवाज यांची नावे कायम असत. गेल्या तीन-साडेतीन दशकांत पहिल्यांदाच या दोघांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळली गेली आहेत. वाजपेयी-अडवानी काळापासून भाजपबरोबर असलेले रूडी व शाहनवाज सध्या भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. याचबरोबर भोजपुरी अभिनेते खासदार रविकिशन यांचेही नाव स्टार प्रचारकांमध्ये नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

रुडी आणि शाहनवाज यांना स्टार प्रचारकांमधून वगळण्यात आल्याने मोठा गदारोळ सुरू झाला. अखेर पक्ष नेतृत्व या मुद्द्यावर बॅकफू़टवर गेल्याचे चित्र आहे. भाजपने या प्रकरणी खुलासा करुन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने ट्विटरवर म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांमध्ये राजीव प्रताप रुडी आणि शाहनवाज हुसेन यांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत नसल्याच्या बातम्या येत आहेत. लक्षात घ्यावे की ही एक यादी आहे. स्टार प्रचारकांची यादी निवडणुकीचे टप्पे आणि कार्यक्रम यानुसार अद्ययावत होत असते. त्यामुळे माध्यमांनी अशा भ्रामक बातम्या देऊ नयेत. 

रुडी यांनी 1996 पासून व वयाच्या 25 व्या वर्षापासून भाजपकडून अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. रूडी सध्या दुसऱ्यांदा खासदार आहेत. मात्र 2019 मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचीही संधी नाकरण्यात आली. रूडी यांनी स्टार प्रचारकांमधून नाव वगळल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, बिहारच्या स्टार प्रचारकांच्या यादीत माझे नाव नसणे माझ्यासाठी दुःखाची बाब आहे. पक्षाने मला आमदाराच्याही लायकीचे समजले नाही. 

या निवडणुकीत शाहनवाज यांना भागलपूरमधून तिकिटाबाबत विचारणा करण्यात आली होती. त्या प्रस्तावाबाबत त्यांनी उदासीनता दाखविल्यावर पक्ष नेतृत्वाने त्यांना आणखी बाजूला केल्याचे सांगितले जाते. शाहनवाज यांनी आपल्याला पक्षाचा हा निर्णय मान्य आहे, अशी प्रतीक्रिया दिली आहे. मात्र, मी अटलजींच्या नवरत्नांपैकी एक आहोत, अशी आठवणही त्यांनी करुन दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com