राज्य पेटलेलं असतानाच भाजपनं नवीन नामकरण वादाला फोडलं तोंड

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका
राज्य पेटलेलं असतानाच भाजपनं नवीन नामकरण वादाला फोडलं तोंड
BJP Latest Marathi NewsSarkarnama

हैदराबाद : आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) नव्याने निर्माण केलेल्या कोनासीमा जिल्ह्याच्या नावाववरून वाद सुरू झाला आहे. जिल्ह्याचे नाव बदलून डॉ. बी.आर.आंबेडकर कोनासीमा जिल्हा करण्याच्या प्रस्तावाविरोधात अमलापुरम शहरात काल (ता.24) बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने परिवहन मंत्र्याच्या घरावर हल्ला करुन ते जाळलं. राज्यात आधीच तणावाचं वातावरण असताना भाजपनं (BJP) नवीन वादाला तोंड फोडलं आहे. यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.

भाजपचे राष्ट्रीय चिटणीस सुनील देवधर यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी गुंटूर शहरात काल सायंकाळी (ता.24) बैठक घेतली. या बैठकीनंतर भाजप नेते, कार्यकर्ते आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे मोर्चाने जिना टॉवरच्या दिशेने जाऊ लागले. या टॉवरचे जिना टॉवर सेंटर हे नाव बदलून माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम असे करावे, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी हा मोर्चा रोखून देवधर यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांना ताब्यात घेतले आहे. यामुुळे कोणताही अनुचित प्रकार टळला.

मागील काही महिन्यांपासून भाजप आणि हिंदू संघटनांनी ऐतिहासिक जिना टॉवरचे नामकरण करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. यानंतर काल भाजप नेत्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या कारवाईमुळे भाजप नेत्यांचा मोर्चा शेवटपर्यंत पोचू शकला नाही. राज्यात आधीत कोनसीमा जिल्ह्याच्या नामकरणावरून तणाव असताना भाजपनेही मोर्चा काढल्यानं शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता व्यक्त होत होती.

BJP Latest Marathi News
जिल्ह्याच्या नामकरणावरून वाद! जमावानं परिवहन मंत्र्याचं घरच जाळलं

जमावाने केलेल्या हल्ल्यात 20 पोलीस जखमी झाले आहेत. तसेच, पोलिसांच्या लाठीमारात काही आंदोलकही जमखी झाले आहेत. या वेळी पोलिसांची (Police) वाहने आणि बसही पेटवून देण्यात आली. पूर्व गोदावरी जिल्ह्यापासून वेगळे करत 4 एप्रिलला कोनासीमा जिल्ह्याची निर्मिती झाली. मागील आठवड्यात कोनासीमा जिल्ह्याचे नाव बदलून डॉ. बी.आर.आंबेडकर कोनासीमा जिल्हा करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. यानंतर काही घटकांनी नाव बदलण्यास विरोध केला. कोनासीमा साधना समितीने नाव बदलण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत जिल्ह्याचे आहे तेच नाव ठेवावे, अशी भूमिका घेतली होती.

BJP Latest Marathi News
काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर! सरचिटणीसांनी पक्षालाच पाडलं तोंडावर

सरकारच्या प्रस्तावाविरोधात काल कोनासीमा साधना समितीने ‘चलो कोनासीमा’चे आयोजन केले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मागील आठवड्यातच जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जमाव भडकला आणि दगडफेक सुरू केली. यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने पोलिसांची गाडी आणि बस जाळली. तसेच परिवहन मंत्री पी. विश्‍वरूपू यांच्या घरावर हल्ला करत जाळपोळ केली. यानंतर अमलापुरममध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in