द्रौपदी मुर्मूंच्या निवडीनंतर देशातील दीड लाख गावांमध्ये भाजपची जंगी सेलिब्रेशनची योेजना

BJP | Draupadi murmu | : १८ राज्यांतील निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीने जंगी सेलिब्रेशन ठरणार महत्वाचे
Draupadi Murmu News
Draupadi Murmu Newssarkarnama

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) यांची देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे २१ जून रोजी निकाल जाहीर होवून अपेक्षेप्रमाणे या सर्वोच्च पदावर निवड झाल्यानंतर देशभरात विशेषतः आदिवासी गाव-पाड्यांवर जोरदार उत्सव साजरा करून, आदिवासी समाजाला व्यापक ‘मेसेज' देण्याची योजना भाजपने (BJP) आखली आहे.

फक्त भाजपनेच या समाजाला देशातील सर्वोच्च घटनात्मक स्थानाचा सन्मान दिला, हा संदेश आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्याची पक्षाची योजना आहे. भाजपची ही योजना केवळ पुढील २ वर्षांमध्ये होणाऱ्या १८ राज्यांतील निवडणुकांतच नव्हे तर २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने आदिवासी समाजाचीही मते लक्षणीय व महत्वाची ठरण्याची शक्यता आहे.

Draupadi Murmu News
शिवसेनेने पाठिंबा देऊनही द्रौपदी मुर्मू 'मातोश्री'वर जाणार नाहीत...

देशात आदिवासी समाजाची बहुसंख्या असलेली सुमारे १ लाख ४० हजार गावे-पाडे-निमशहरे आहेत. देशाला पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती मिळाल्याचा उत्सव भाजपच्या वतीने या साऱया गावांमध्ये धूमधडाक्यात साजरा केला जाईल. पक्षाचे केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, राज्य व केंद्रीय पक्षसंघटटनांचे नेते या साऱयांना या उत्सवात सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना दिल्लीतून देण्यात आल्या आहेत. याद्वारे आदिवासी समाजापर्यंत ठोस मेसेज देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या १६ जुलै रोजी सर्व राज्यांचे राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची भेट घेवून त्यांना निरोप देताना मेजवानीही देतील. राष्ट्रपती भवनात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू हे देखील दुसऱ्या दिवशी (ता.१७) दुपारी आपल्या मौलाना आझाद रस्त्यावरील निवासस्थानी साऱया राज्यपालांना मेजवानी देतील.

Draupadi Murmu News
'विद्यमान आघोरी सरकारकडून आततायीपणाचा निर्णय!'

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांचा मुकाबला विरोधी आघाडीचे यशवंत सिन्हा यांच्याशी आहे. भाजपने या लढतीला ‘आहे रे‘ (सिन्हा) विरूध्द ‘नाही रे‘ (मुर्मू) असा रंग देऊन प्रचार चालविला आहे. यशवंत सिन्हा यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये अर्थ, विदेश यांसारख्या महत्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली होती. मात्र पुढे पंतप्रधानपदी आलेल्या मोदींचे आणि भाजप नेतृत्वाशी त्यांच्याशी पटेनासे झाले.

यशवंत सिन्हांचे पुत्र जयंत सिन्हा यांना मोदींनी सुरवातीला अर्थ राज्यमंत्रीपदही दिले होते. त्यामुळे सिन्हा राष्ट्रपतीपदासाठी भाजपविरूध्द उभे असल्याने जयंत सिन्हा यांच्यासमोर आणखी एक धर्मसंकट उभे राहिले आहे. मात्र त्यांच्या एका मताने आता भाजपला फरक पडणार नाही असे सध्याचे चित्र आहे. कारण महिला, त्यातही आदिवासी समाजातील हा मुद्दा इतका प्रभावी ठरला आहे की भाजपच्या विरोधात गेलेले अकाली दल, शिवसेना. धर्मनिरपेक्ष जनता दल, बसपा आणि कॉंग्रेसबरोबर असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चासारख्या पक्षांनीही मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रपतीपदाच्या ‘इलेक्टोरल कॉलेज' चा विचार केल्यास भाजपकडे स्वतःची हक्काची मते विजयाच्या जवळपास जाणारी आहेत. त्यात मुर्मू यांना पाठिंबा देणाऱया पक्षांची संख्या सातत्याने वाढली असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येही भाजपचे नेतृत्व १८ जुलैच्या प्रत्यक्ष मतदानाबबात कोणतीही रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे बीजू जनता दल, वायएसआर कॉंग्रेस, अण्णाद्रमुक या पक्षांबरोबर भाजप अध्यक्षांच्या पातळीवर सातत्याने संपर्क ठेवला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com