भाजपनं ममतांना आणलं अडचणीत; उमेदवारी अर्जात माहिती लपवल्याची तक्रार

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढतआहेत.
भाजपनं ममतांना आणलं अडचणीत; उमेदवारी अर्जात माहिती लपवल्याची तक्रार
bjp objects mamata banerjee nomination papers

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या भवानीपूर (Bhawanipur) मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या निवडणूक अर्जावर भाजपने (BJP) आक्षेप घेतला आहे. मात्र, तृणमूलने हा आक्षेप फेटाळून लावला आहे. 

भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ममतांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या 5 गुन्ह्यांच्या उल्लेख केला नसल्याची तक्रार भाजपकडून करण्यात आली. आसाम पोलिसांनी दाखल केलेले हे 5 गुन्हे आहेत. ममतांनी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल आहेत. तृणमूलने मात्र, हा आक्षेप फेटाळून लावला आहे. एखादा दाखल गुन्ह्यात विरोधात आरोपपत्र दाखल झाले असेल तर त्याची माहिती द्यावी लागते, असे उत्तर तृणमूलने दिले आहे. 

भाजपला ममतांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायचा होता परंतु, अनेक नेत्यांना यास नकार दिला. डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीने बडे भाजप नेते ममतांच्या विरोधात मैदानात उतरण्यास तयार नाहीत. राज्यात तृणमूलच्या विजयानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी कोलकता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये टिबरेवाल यांचा समावेश आहे. याच याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 

प्रियांका या कोलकता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. त्यांनी 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपचे खासदार बाबुल सुप्रिया यांच्या विधी सल्लागार म्हणून प्रियांका काम करीत होत्या. सुप्रियो यांनीच त्यांना सक्रिय राजकारणात आणून त्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवला होता. प्रियांका या मागील विधानसभा निवडणुकीत एंटली मतदारसंघात भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांचा त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार स्वर्णा कमल यांच्याकडून पराभव झाला होता. याचबरोबर कोलकता महापालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत टिबरेवाल या तृणमूलच्या स्वपन सम्मादार यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. नंतर 2020 मध्ये त्यांची भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बनवण्यात आले होते. 

पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूरला सोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदिग्राममध्ये जाण्याचा निर्णय चांगलाच भोवला होता. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले खरे पण त्यांना तेथे पराभव पत्करावा लागला. आता त्यांना पुन्हा निवडणूक लढवून विजयी होत मुख्यमंत्रिपद टिकवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूरला पसंती दिली आहे. पण भाजपनंही ममतांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य भाजपने सहा जणांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. यातील भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रियांका टिबरेवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने बंगालमधील तीन तर ओडिशामधील एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बंगालमधील भवानीपूरसह समशेरगंज आणि जांगीरपूर तर ओडिशातील पिपली मतदारसंघात 30 सप्टेंबरला मतदान होईल. निवडणुकीचा निकाल 3 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. इच्छुकांना 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in