बंगालमध्ये भाजपला खिंडार : राष्ट्रीय उपाध्यक्षांचा पुत्रासह तृणमूलमध्ये प्रवेश - BJP national vice president Mukul Roy joins TMC | Politics Marathi News - Sarkarnama

बंगालमध्ये भाजपला खिंडार : राष्ट्रीय उपाध्यक्षांचा पुत्रासह तृणमूलमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जून 2021

पश्चिम बंगालमधील पराभवानंतर राज्यातील भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे नेत्यांची तृणमूलमध्ये घरवापसी सुरू झाली आहे. 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) पराभवानंतर राज्यातील भाजपमध्ये (BJP) अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार मुकुल रॉय (Mukul Roy) यांची आज घरवापसी होणार आहे. रॉय हे आज तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेण्यासाठी तृणमूल भवनमध्ये दाखल झाले. नंतर त्यांनी तृणमूलमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला. 

मागील काही आठवड्यांपासून रॉय यांच्या घरवापसीची चर्चा होती. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नुकतीच पक्षाची बैठक कोलकत्यात बोलावली होती. या बैठकीला रॉय यांनी दांडी मारली. मागील काही दिवसांपासून रॉय यांनी मौन धारण केले  होते. सार्वजनिकरीत्या त्यांनी कोणतेही विधान केलेले नव्हते. मात्र, रॉय यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी ते तृणमूलमध्ये परततील, ही शक्यता नाकारली नव्हती. 

मुकुल रॉय हे आज तृणमूल भवनमध्ये दाखल झाले. ममतांनी आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक तृणमूलमध्ये भवनमध्ये बोलावली आहे. रॉय यांनी ममतांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ममता आणि त्यांचे भाचे व तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय आणि त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांचा पक्षप्रवेश झाला. 

हेही वाचा : उत्तराखंडचा फॉर्म्युला उत्तर प्रदेशात? 

मुकुल रॉय यांनी ममतांवर व्यक्तिगत पातळीवरील टीका करणे टाळले, त्यामुळे त्यांचा समावेश मवाळ नेत्यांमध्ये होतो. याचवेळी सुवेंदू अधिकारी यांनी सातत्याने ममतांना लक्ष्य केले त्यामुळे त्यांचा समावेश जहाल नेत्यांमध्ये होतो. मवाळ नेत्यांसाठी तृणमूलचे दरवाजे खुले आहेत. या पार्श्वभूमीवर तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी मुकुल रॉय यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमज्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश होता. भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली. भाजपमध्ये ते बाजूला फेकले गेले असून, ते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख