माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी इंडिगोचे पायलट बनतात तेव्हा... - bjp mp rajiv pratap rudy flies indigo delhi to chennai flight | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी इंडिगोचे पायलट बनतात तेव्हा...

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जुलै 2021

द्रमुकचे नेते खासदार दयानिधी मारन हे दिल्लीहून चेन्नईला इंडिगोच्या विमानात जात होते. या विमान प्रवासात त्यांना मोठा धक्का बसला. 

कोलकता : द्रमुकचे (DMK) नेते खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) हे दिल्लीहून चेन्नईला इंडिगोच्या विमानाने जात होते. या विमान प्रवासात त्यांना मोठा धक्का बसला. कारण या विमानाचे पायलट दुसरेतिसरे कुणी नसून खुद्द माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे खासदार राजीव प्रताप रूडी (Rajiv Pratap Rudy) होते. विमानात मारन यांचे स्वागतही रूडी यांनी केले परंतु, मास्कमुळे ते त्यांना लगेच ओळखूही शकले नाहीत. 

मारन हे दिल्लीत इंडिगोच्या विमानात बसल्यानंतर कॅप्टन त्यांच्याजवळ आला. तुम्हीही याच विमानातून प्रवास करीत आहात का, असा प्रश्न कॅप्टनने मारन यांना विचारला. यावर मारन यांनी होकार दर्शवला. त्यांना कॅप्टनचा आवाज ओळखीचा वाटला. परंतु, त्यांना नेमके कोण आहे हे ओळखता आले नाही. यावर तुम्ही मला ओळखले नाही का, असा प्रश्न कॅप्टनने विचारला. त्यावेळी कॅप्टन म्हणजे खुद्द राजीव प्रताप रूडी असल्याचे समोर आले. 

दोन तासांपूर्वी मारन आणि रूडी हे दोघेही एका संसदीय समितीच्या बैठकीला एकत्र होते. नंतर त्यांची विमानात अशी भेट झाल्याने मारन यांना आश्चर्याचा धक्का बसला. मारन यांनी ट्विट करीत हा किस्सा सांगितला आहे. मारन यांनी म्हटले आहे की, रूडी यांना पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी प्रवास करीत असलेल्या दिल्ली-चेन्नई विमानाचे ते पायलट आहेत हे मला माहिती नव्हते. 

हेही वाचा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष ट्विट करुन थेट हिमालयात गेले निघून 

रूडी हे व्यावयासिक वैमानिकही म्हणून काम करतात. ते माझे चांगले मित्र आणि सहकारी असून, ते कॅप्टन असलेल्या विमानातून प्रवास करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. माझे पिता केंद्रीय वाणिज्य मंत्री होते, त्यावेळी त्याच खात्याचे रूडी हे राज्यमंत्री होते, असेही मारन यांनी म्हटले आहे. 

रूडी हे अनेक विषयांत पारंगत आहेत. याविषयी रूडी म्हणाले की,  वैमानिक हा माझा चौथा व्यवसाय आहे. मी अर्थशास्त्र शिकवतो. याचबरोबर पाटण्यात वकील म्हणूनही काम करतो. मी राजकारणातही आहे आणि वैमानिकही आहे. प्रवासी बनण्यापेक्षा व्यावसायिक विमानांचा मानद वैमानिक म्हणून काम करणे मला आवडते. माझ्याकडे याचा परवाना असून, तो कायम ठेवण्यासाठी मला वैमानिकाचे काम करावे लागते. मी कुणाचाही कर्मचारी नसून, मी याचा पगारही घते नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख