ममतांवर सायंकाळी 5 नंतर हल्ला होईल; भाजप खासदाराने आधीच केली होती भविष्यवाणी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता ममता बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर राज्यात मोठे राजकीय नाट्य सुरू झाले आहे.
bjp mp post on social media about attack on mamata banerjee before incident
bjp mp post on social media about attack on mamata banerjee before incident

कोलकता : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला आहे. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पुढील दोन-तीन दिवस त्यांना रुग्णालयात थांबावे लागणार आहे. त्यावरून बंगालमध्ये मोठे राजकीय नाट्य सुरू झाले आहे. भाजपच्या एका खासदाराने ममतांवर हल्ला होईल, अशी पोस्ट सोशल मीडियावर आधीच टाकल्याचे उघड झाले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. ममता बॅनर्जींचे एकेकाळचे विश्वासू सहकारी असलेले सुवेंदू अधिकारी आता त्यांच्याच विरोधात भाजपकडून नंदिग्राममध्ये मैदानात उतरले आहेत. नंदिग्राममधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या ममतांवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्ला झाला त्यावेळी सुरक्षेसाठी पोलीस हजरच नव्हते, असा आरोप ममतांनी केला आहे. 

या हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या तृणमूलने निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर केले आहे. याचबरोबर यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. याविषयी बोलताना तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन म्हणाले की, निवडणूक आयोगाचे राज्याच्या पोलीस महासंचालकांची 9 मार्चला बदली केली. त्यानंतर 10 मार्चला भाजपच्या खासदाने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यात म्हटले होते की, सायंकाळी 5 वाजल्यानंतर ममतांवर हल्ला होईल. ममतांवर सायंकाळी 6 वाजता हल्ला झाला. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवे. 

या हल्ल्याला जबाबदार असलेल्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करायला हवा. या हल्ल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विविध प्रकारची विधाने केली. ही विधाने अतिशय चुकीची होती. त्यांचा आम्ही निषेध करतो. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ममतांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोलू शकता आणि नेमकी किती दुखापत झाली आहे, हे जाणून घेऊ शकता, असेही ओब्रायन यांनी स्पष्ट केले. 

ममता बॅनर्जी या काल नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. ममता या मोटारीत बसत असताना त्यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. सुरक्षारक्षकांनी ममतांना उचलून मोटारीत बसवल्याचे दिसले. या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

काल रात्री नंदिग्राममध्ये मुक्काम करण्याचे ममतांचे नियोजन होते. मात्र, या हल्ल्यानंतर त्या थेट कोलकत्याकडे रवाना झाल्या. आज पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विभू गोयल व जिल्हा पोलिस अधिक्षक प्रवीण प्रकाश यांनी आज ममतांवर ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या बिरुलिया बाजार परिसरास भेट देऊन पाहणी केली. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com