दीपिका म्हणजे संपूर्ण बॉलीवूड नव्हे, काही जणांनी ड्रग्ज घेतले म्हणून सगळेच घेतात असे नाही! - bjp mp manoj tiwari targets deepika padukone on drugs issue | Politics Marathi News - Sarkarnama

दीपिका म्हणजे संपूर्ण बॉलीवूड नव्हे, काही जणांनी ड्रग्ज घेतले म्हणून सगळेच घेतात असे नाही!

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी समोर आलेल्या ड्रग्ज अँगलची चौकशी एनसीबी करीत आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. या प्रकरणी अनेक नावे चौकशीत समोर येऊ लागली आहेत. काही वृत्तवाहिन्यांनी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची चौकशी होणार असल्याचे वृत्त दिले. यावरुन भाजप नेते खासदार मनोज तिवारी यांनी तिला लक्ष्य केले आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

काही वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणी अभिनेत्री दिया मिर्झा आणि दीपिका पदुकोण यांची चौकशी होणार असल्याचे वृत्त दिले आहे. यावरुन संतापलेल्या दियाने या प्रकरणी खुलासा केला आहे. तिने म्हटले आहे की, माझ्यावरील सर्व आरोप मी फेटाळून लावते. हे आरोप खोटे, निराधार आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या खोट्या वृत्तांमुळे माझी प्रतिमा मलिन होत आहे. मी अनेक वर्षे कठोर परिश्रम करुन बनविलेल्या करिअरवर याचा परिणाम होत आहे. 

मी आयुष्यात कधीही ड्रग्ज खरेदी केलेले अथवा घेतलेले नाही. भारताची कायदा पाळणारी नागरिक या नात्याने मी या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार आहे. या काळात माझ्या पाठिशी उभे राहणाऱ्या चाहत्यांचे मी आभार मानते, असे दियाने म्हटले आहे. 

याच मुद्द्यावर भाजप नेते खासदार मनोज तिवारी यांनी दीपिकाला लक्ष्य केले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे की, दीपिका पदुकोण ही संपूर्ण चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करीत नाही. काही फळे खराब असली म्हणून सगळी फळे खराब असतातच असे नाही. त्याचप्रमाणे चित्रपट सृष्टीतील सगळेच ड्रग्ज घेतात असे नाही. 

रिया चक्रवर्तीच्या चौकशीत तिने बॉलीवूडमधील कलाकारांची नावे उघड केली आहेत. यात अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, राकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना या आठवड्याच्या अखेरीस चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. यात काही वृत्तवाहिन्या आता दीपिका पदुकोणचेही नाव घेऊ लागल्या आहेत. बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख