महाकाल मंदिरात पूजा करुन जोतिरादित्य शिंदेंनी गाठलं दिल्लीचं विमान - bjp mp jyotiraditya scindia performs ritual in mahakal temple | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

महाकाल मंदिरात पूजा करुन जोतिरादित्य शिंदेंनी गाठलं दिल्लीचं विमान

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार होणार आहे. या विस्ताराच्या हालचालींना गती मिळाली आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार होणार आहे. विस्ताराच्या हालचालींना गती मिळाली असून, मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले अनेक नेते दिल्लीत दाखल होऊ लागले आहेत. मध्य प्रदेशातील भाजप नेते जोतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी आज उज्जैनमधील महाकाल मंदिरात पूजा करुन दिल्लीचे विमान गाठले. 

केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले मध्य प्रदेशातील नेते जोतिरादित्य शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पडले होते. नंतर तेथे भाजपचे सरकार स्थापन झाले होते. शिंदे यांनी आज सकाळी उज्जैनमधील महाकाल मंदिरात पूजा केली. त्यानंतर ते इंदोरमधून विमानाने दिल्लीला रवाना झाले. 

हेही वाचा : मोठे फेरबदल..केंद्रीय मंत्री बनले राज्यपाल 

महाराष्ट्रातील भाजप नेते नारायण राणे आणि जनता दलाचे नेते आर.सी.पी.सिंह हेसुद्धा दिल्लीत दाखल झाले आहेत. याचबरोबर पंकज चौधरी, रिटा बहुगुणा जोशी, रामशंकर कथेरिया, वरुण गांधी आणि राहुल कासवान यांच्यासह अपना दलाच्या अनुप्रिया पटेल आदी दिल्लीत दाखल झाले आहेत. या सर्वांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ मंत्र्यांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासोबत आज सायंकाळी 5 वाजता बैठक आयोजित केली होती. ती बैठक रद्द करण्यात आली आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

सर्वांनंद सोनोवाल यांनी आसाममध्ये भाजपला दुसऱ्यांदा विजय मिळवून देत हिमंत बिस्वा सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला होता. त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात आहे. याचबरोबर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल. भाजपने त्यांना राज्यातून हलवून केंद्रात नेल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. याचबरोबर राजस्थान आणि  बिहारचे भाजप प्रभारी भूपेंदर यादव, मध्य प्रदेशातील नेते व पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि पक्षाचे प्रवक्ते जफर इस्लाम यांचाही समावेश मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख