भाजप आमदार अन् पत्नीत अखेर 'सेटलमेंट' झाली

भाजप आमदाराकडून पत्नीचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतरराजकारण तापलं होतं.
BJP MLA Vishal Neharias wife takes police complaint back
BJP MLA Vishal Neharias wife takes police complaint back

नवी दिल्ली : भाजप आमदाराकडून पत्नीचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हिमाचल प्रदेशातील राजकारण तापलं होतं. पण आता या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. सरकारी सेवेत नोकरीस असलेल्या पत्नीने पतीविरोधातील तक्रार अखेर मागे घेतली आहे. पतीविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात येऊ नये, अशी विनंतीच त्यांनी पोलिसांना जबाबावेळी केली. (BJP MLA Vishal Neharias wife takes police complaint back)

हिमाचल प्रदेशातील धरमशालाचे भाजप आमदार विशाल नेहरिया यांच्याविरोधात पत्नी ओशीन शर्मा (Oshin Sharma) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. ओशीन यांनी आमदार पतीवर मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. याबाबत माहिती देणारा 11 मिनिटांचा व्हिडिओ तयार केला करून त्यांनी सोशल मीडियात टाकला होता. ओशीन या हिमाचल प्रदेश प्रशासकीय सेवेतील (HPAS) 2020 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. 

मागील आठवड्यापासून हे प्रकरण गाजत आहे. राज्यातील भाजप सरकारचीही डोकेदुखी वाढली होती. काँग्रेसनंही हा मुद्दा उचलून धरत नेहरिया यांच्या अटकेची मागणी केली होती. तसेच त्यांच्या आमदाराकीचा राजीनामाही मागितला होता. महिला आयोगानंही पोलिसांकडून तातडीनं अहवाल मागवला होता. त्यामुळे नेहरिया यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली होती. आता ओशीन यांनी तक्रारच मागे घेतल्याने नेहरिया यांना दिलासा मिळाला आहे.

ओशीन यांनी सोमवारी पोलिसांना दिलेल्या जबाबावेळी पतीविरोधात कोणताही गुन्हा दाखल करू नये, अशी विनंती केली आहे.  कांगराचे पोलिस अधिक्षक विमुक्त रंजन यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही हा मुद्दा कौटूंबिक असल्याने दोघांनीच त्यातून मार्ग काढावा, असं म्हटलं होतं.

दरम्यान, नेहरिया आणि ओशीन यांचा विवाह दोन महिन्यांपूर्वी 26 एप्रिल रोजी झाला आहे. नेहरिया 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत. लग्न झाल्यानंतर पतीने चौथ्याच दिवशी आपल्याला घरातून बाहेर काढले. त्यावेळी आपण कोरोनाबाधित होतो. स्वत:चं काहीतरी बरं-वाईट करून घेण्याची धमकी दिल्यानं आपण पुन्हा घरी आल्याचा दावा ओशीन यांनी केला आहे. 

दोघे एकमेकांना महाविद्यालयांपासून ओळखत होते. त्याकाळात नेहरिया यांच्याकडून मारहाण व्हायची, त्यामुळं आमच्यातील संबंध त्याचवेळी तुटले होते. पण 2019 मध्ये नेहरिया यांनी आमदार झाल्यानंतर ओशीन यांना 2019 मध्ये लग्नाची मागणी घातली. ते प्रामाणिकपणे आपल्याशी वागतील, या उद्देशाने लग्नाला होकार दिल्याची माहिती ओशीन यांनी दिली. सासरच्यांनी हुंड्याचीही मागणी केली. आपल्या पालकांनी लग्नावेळी त्यांना 1 लाख 20 हजारांची सोन्याची चैन तसंच एक लाख रुपयांची अंगठी दिली आहे, असंही ओशीन यांनी सांगितलं होतं.

नेहरिया यांनी मात्र, पत्नीने केलेला आरोप फेटाळून लावले आहेत. लग्नाआधीच आमच्यामध्ये मैत्री होती. पण लग्नानंतर काही दिवसांतच ओशिनने कुटूंबियांवर मानसिक दबाव टाकण्यास सुरूवात केली. अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला. ही बाब घरापर्यंत सीमित ठेवली. अजूनही घरातील बाबी घरातच राहायला हव्यात, यासाठी प्रयत्न करत असल्याचे नेहरिया यांनी सांगितलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com