'संस्कारी' भाजप आमदाराची अभिनेत्रींनी केली 'धुलाई' - bjp mla surendra singh criticized for his remark over rape and culture | Politics Marathi News - Sarkarnama

'संस्कारी' भाजप आमदाराची अभिनेत्रींनी केली 'धुलाई'

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

हाथरसमधील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी मुलींच्या पालकांना संस्कार शिकवणाऱ्या भाजप आमदाराने नवा वाद ओढवून घेतला आहे. 

लखनौ : हाथरस येथील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात वातावरण पेटले आहे. या मुद्द्यावर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार तोंडघशी पडले आहे. या प्रकरणावरुन एवढा गदारोळ सुरू असताना उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजप आमदाराने बलात्कारासाठी मुलींच्या पालकांनाच जबाबदार धरले आहे. अभिनेत्री पूजा बेदी, क्रिती सॅनॉन आणि स्वरा भास्कर यांनी या आमदाराची सोशल मीडियावर चांगलीच 'धुलाई' केली आहे. 

हाथरसमधील 19 वर्षांच्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) दिली आहे. 

या प्रकरणी उत्तर प्रदेशातील भाजप सरकार अडचणीत आले आहे. असे असताना भाजपचे बलिया मतदारसंघातील आमदार सुरेंद्रसिंह यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पालकांनी मुलींवर संस्कार केल्यास बलात्कारच होणार नाहीत. बलात्कारासारख्या घटना केवळ संस्कारातून थांबू शकतात. शिक्षा अथवा तलवारीने असे प्रकार थांबू शकत नाहीत. सर्व माता-पित्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या तरुण मुलींना संस्कारी वातावरणात शालिनतेने वागणे शिकवायला हवे. 

सरकारचा धर्म हा संरक्षण करणे हा असून, कुटुंबाचा धर्म हा मुलांना चांगली मूल्ये शिकवणे हा आहे. सरकार आणि चांगली मूल्ये यांच्या संयोगातून आपण देश सुंदर बनवू, असेही सिंह यांनी म्हटले आहे. सिंह यांच्या विधानावरुन सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात लक्ष्य झाले आहेत. मुलींवर संस्कार करायला शिकवण्याऐवजी मुलांवर योग्य संस्कार व्हायला हवेत, हे आधी आमदारांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्यांना सोशल मीडियावर देण्यात आला आहे. अभिनेत्री क्रिती सॅनॉन, पूजा बेदी आणि स्वरा भास्कर यांनी या मुद्द्यावर आमदारांची चांगलीच 'धुलाई' केली आहे.  

क्रिती सॅनॉन हिने ट्विटरवर म्हटले आहे की, मुलींना शिकवायचे की तुमच्यावर बलात्कार कसा होऊ नये? तुम्ही बोलताना स्वत:तरी विचार करता का? पहिल्यांदा ही मानसिकता बदलायला हवी. ते त्यांच्या मुलांना का संस्कार शिकवू शकत नाहीत? 

स्वरा भास्करने सुरेंद्रसिंह यांचा एक जुना व्हिडीओ ट्विट केला आहे. यात सिंह यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणाचे समर्थन केलेले दिसत आहे. स्वराने म्हटले आहे की, हा मनुष्य अतिशय खालच्या दर्जाचा आणि आधीपासूनचा पापी आहे. 

पूजा बेदी हिने या प्रकरणी भाजपला सवाल केला आहे. तिने म्हटले आहे की, अशा प्रकारचे राक्षस आणि पितृसत्ताक संस्कृतीचे गोडवे गाणारे मूर्ख भाजपने भरून ठेवले आहेत. सत्ताधारी पक्षाचेच आता शुद्धिकरण करण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटते? 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख