खबरदार, गोस्वामींच्या केसाला जरी धक्का लावाल; राम कदमांचा सरकारला इशारा - bjp mla ram kadam reaches taloja jail to meet arnab goswami | Politics Marathi News - Sarkarnama

खबरदार, गोस्वामींच्या केसाला जरी धक्का लावाल; राम कदमांचा सरकारला इशारा

वृत्तसंस्था
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांच्या जिवाला धोका असल्याचा दावा भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे. 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गोस्वामी हे सध्या तळोजा तुरुंगात आहेत. गोस्वामी यांनी जामिनासाठी आज अलिबाग न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, गोस्वामी यांच्या जिवाला धोका असल्याचा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला असून, या प्रकरणी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

गोस्वामींच्या अटकेवरुन राम कदम आक्रमक झाले असून, त्यांनी महाविकास आघाडी सरकारला 'रावणराज'ची उपमा दिली आहे. गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांनी उपोषणही केले होते. या प्रकरणी राम कदम यांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. राम कदम हे आज गोस्वामी यांना तळोजा तुरुंगात भेटण्यासाठी पोचले आहेत. 

या वेळी बोलताना राम कदम म्हणाले की, गोस्वामी यांच्या जिवाला धोका आहे. गोस्वामींच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही सहन करणार नाही, असे मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो. ही केवळ लढाई नसून, बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेचे संरक्षण करण्याची लढाई आहे. लोकशाही वाचवण्यासाठी  आणि आणीबाणीला विरोध करण्यासाठी हा लढा आहे. 

कदम हे तळोजा तुरुंगाच्या अधीक्षकांचीही भेट घेणार आहेत. गोस्वामी यांच्या सुटुकेबाबत ते चर्चा करणार असून, शक्य झाल्यास गोस्वामी यांचीही भेट घेणार आहेत. तळोजा तुरुंगाबाहेर आंदोलन करण्याचा मला अधिकार असून, मी तो बजावेन, अशी भूमिकाही कदम यांनी घेतली आहे. 

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तुरुंगात हलवण्यात आले. सध्या ते तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. 

गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयात त्यावर 7 नोव्हेंबरला सुनावणी झाली होती. गोस्वामी यांनी अटकेला आव्हान देऊन या प्रकरणातून तात्पुरता दिलासा देण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवून, गोस्वामी यांना तातडीने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होती. याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यास 4 दिवसांची मुदत दिली होती. 

उच्च न्यायालयाने आज गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर निर्णय दिला. उच्च न्यायालयाने गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे गोस्वामी यांनी अलिबाग न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर अलिबाग न्यायालयाला चार दिवसांत निर्णय देण्याचेही उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख