आमदाराची काय लायकी असते का..? भाजप आमदाराचा घरचा आहेर - bjp mla rakesh rathore criticizes own government in uttar pradesh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

आमदाराची काय लायकी असते का..? भाजप आमदाराचा घरचा आहेर

वृत्तसंस्था
सोमवार, 17 मे 2021

देशातील कोरोना संकटाच्या हाताळणीवरुन उत्तर प्रदेशातील भाजप सरकारबद्दल नाराजी वाढली आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19) संकटाच्या हाताळणीवरुन उत्तर प्रदेशातील (Uttar Prdesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील भाजप (BJP) सरकारबद्दल नाराजी वाढली आहे. उत्तर प्रदेशातील भाजप आमदाराने (BJP MLA) तर सरकारवर टीका केल्यास माझ्यावर देशद्रोहाचा (Sedition)  गुन्हा दाखल होईल, अशी जाहीर कबुली दिली आहे. आमदारांची लायकी काय असते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

राज्यातील कोरोना संकटावरुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधक टीका करीत आहेत. आता सीतापूर जिल्ह्यातील भाजपचे आमदार राकेश राठोड यांनी सरकारच्या कामाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. लखनौपासून सीतापूर हे केवळ 80 किलोमीटरवर आहे. सरकारला अनेक वेळा सांगूनही सरकार ऐकत नाही, अशी कबुली त्यांनी दिली आहे. 

मी अनेक पावले उचलली परंतु, आमदारांची लायकी असते का? मी जर जास्त बोललो तर माझ्यावरच राज्य सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करेल, असे राठोड म्हणाले. सीतापूर येथील ट्रॉमा सेंटर अद्याप सुरू नसून, इमारत पूर्ण होऊन अनेक वर्षे उलटली आहेत. राठोड यांना सरकार दरबारी पाठपुरावा करुनही ते सुरू करता आलेले नाही. 

राज्यातील तुमच्याच पक्षाचे सरकार तुमचे ऐकत नाही का, यावर राठोड म्हणाले की, आमदारांना त्यांच्या मनातील बोलता येते असे तुम्हाला वाटते का? मी याआधी अनेकवेळा हा प्रश्न उपस्थित केला आहे. 

हेही वाचा : बँकांवर मोठं संकट : हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू 

राठोड हे आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले आहेत. राज्यातील 2017 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांना भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी अपक्ष आणि बहुजन समाज पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मागील वर्षी राठोड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. 
राठोड यांनी गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. यावरुन त्यांना राज्यातील पक्ष नेतृत्वाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, तुम्ही टाळ्या वाजवून कोरोना विषाणू घालवू शकणार नाही. तुम्ही मूर्खपणाचे सर्व रेकॉर्ड मोडून काढत आहात. शंख वाजवून कोरोना जाणार आहे का? तुमच्यासारखे लोक मूर्ख आहेत. 

देशात 24 तासांत कोरोनामुळे 4 हजार 106 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख  81  हजार 386 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 106 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 74 हजार 390 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख