आपल्याच सरकारच्या विरोधात आमदाराचा विधानसभेच्या पायऱ्यांवर 'वन मॅन शो'!

मुसळधार पावसामुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना अद्याप मिळत नसल्याचे चित्र आहे.
bjp mla m p kumaraswamy protests in front of karnataka assembly
bjp mla m p kumaraswamy protests in front of karnataka assembly

बंगळूर : मुसळधार पावसामुळे कर्नाटकात (Karnataka) मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना अद्याप मिळत नसल्याचे चित्र आहे. या विरोधात सत्तारुढ भाजपच्याच आमदाराने अनोखे आंदोलन करुन लक्ष वेधले आहे. भाजपचे (BJP) आमदार एम.पी.कुमारस्वामी (M.P.Kumaraswamy) यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर एकट्यानेच बसून आंदोलन केल्याने सरकारवर टीका होऊ लागली आहे. 

आमदार कुमारस्वामी विधानसभेच्या पायऱ्यावर एकटेच बसलेले दिसले. त्यांच्या हातात एक फलक होता. सत्तारुढ भाजपचाच आमदार एकटाच पायऱ्यावर आपल्याच सरकारच्या विरोधात बसल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. कर्नाटकात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठा पूर आला होता. कुमारस्वामी यांचा मतदारसंघ मुडिगेरे आहे. मतदारसंघातील पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, ही मागणी त्यांनी केली आहे.

कुमारस्वामींनी म्हटले आहे की, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) अंतर्गत देण्यात येणाऱ्या मदतीसाठी मुडिगेरेचा समावेश सरकारने करावा. पावसामुळे पिके, जमीन आणि घरांचे नुकसान झाले आहे अशा कुटुंबांना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मदत करावी. 2019 मध्ये आलेल्या मुसळधार पुरात सहा जण वाहून गेले होते. त्यांचे मृतदेह आम्ही दोन आठवडे शोधत होते. त्यावेळी घरे आणि कॉफीचे मळे वाहून गेलेल्यांना नुकसान भरपाईची मागणी आम्ही केली होती. परंतु, मागील वर्षी पुन्हा पूर आला तरी त्यांना मदत मिळाली नाही. 

कर्नाटकात बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई हे आले आहेत. बोम्मई यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर महिन्याच्या आतच त्यांच्यासमोरील अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांनी त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. यातच खातेवाटपात महत्वाचे खाते न मिळालेले मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. आता भाजपच्याच आमदाराने अशा प्रकारे विधानसभेबाहेर सरकारविरोधात आंदोलन केल्याने बोम्मई तोंडघशी पडले आहेत. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. राजीनाम्यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी.किशन रेड्डी यांनी भाजप आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत येडियुरप्पाही उपस्थित होते. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com