मुख्यमंत्र्यांच्या उचलबांगडीसाठी भाजप आमदाराचे थेट चामुंडेश्वरीला साकडे - bjp mla basanagouda patil yatnal visits chamundeshwari temple | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

मुख्यमंत्र्यांच्या उचलबांगडीसाठी भाजप आमदाराचे थेट चामुंडेश्वरीला साकडे

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जुलै 2021

कर्नाटकात भाजपमधील अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हटवण्यासाठी जोरदार मोहीम सुरू झाली आहे. 

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवले जावे, यासाठी माजी केंद्रीय मंत्री व भाजप आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांनी आता थेट चामुंडेश्वरीला साकडे घातले आहे. दुष्टांचा संहार करावा, असे साकडे घातल्याचे यतनाळ यांनी सांगितले. 

आमदार यतनाळ यांनी येडियुरप्पांच्या विरोधात उघड बंड पुकारले आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा येडियुरप्पांवर हल्लाबोल केला. म्हैसूरमधील चामुंडा हिल्सवरील चामुंडेश्वरीचे दर्शन आज यतनाळ यांनी घेतले. त्यावेळी त्यांनी आपलेच सरकार भ्रष्टारात गुंतले असल्याचा घरचा आहेर दिला. कर्नाटकात भाजपला वाचवायचे असेल तर मुख्यमंत्रिपदावरुन येडियुरप्पांना हटवावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

यतनाळ म्हणाले की, दुष्टांचा संहार करावा, यासाठी मी चामुंडेश्वरीला साकडे घातले आहे. राज्यातील स्थितीवर पक्षश्रेष्ठींचे बारकाईने लक्ष आहे. लवकरच राज्यातील नेतृत्वाबाबत पक्षाकडून निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांचे पुत्र व भाजपचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांच्याकडून भ्रष्टाचार होत आहे. याबाबतचे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांच्या ड्रॉइंग रुममध्ये होत आहे. गुन्हे शाखेकडून तेथे छापे मारले जात नाहीत.  

हेही वाचा : गेहलोत अन् पायलट यांच्यासाठी उद्याचा दिवस महत्वाचा 

दरम्यान, कर्नाटकचे मंत्री बी.श्रीरामलू यांचे सहकारी राजन्ना यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. मुख्यमंत्र्यांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाली होती. येडियुरप्पा आणि मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांचे संबंध काही दिवसांपासून बिघडले आहेत. राज्य सरकारमध्ये येडियुरप्पा कुटुंबीयांचा सातत्याने हस्तक्षेप सुरू आहे. सरकारच्या प्रत्येक विभागात येडियुरप्पांचा मुलगा ढवळाढवळ करीत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कर्नाटक सरकारमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत संघर्षाचा संबंध या कारवाईशी जोडला जात आहे. 

कर्नाटकात मागील काही काळापासून भाजपच्या नेत्यांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याचबरोबर काही आमदारांनी तर थेटपणे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. राज्यातील भाजप नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल मोठी नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवले जाईल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी अरुणसिंह यांनी नुकतीच राज्यातील नेत्यांशी चर्चा केली होती. 

काही दिवसांपूर्वी पक्षाचे नेते आमदार एच.विश्वनाथ यांनी येडियुरप्पांबद्दल संपूर्ण मंत्रिमंडळच नाराज असल्याचा बॉम्ब टाकला होता. येडियुरप्पांचे एकेकाळचे निकटवर्ती सहकारी के.एस.ईश्वरप्पा यांनीही विरोधात मोहीम उघडली आहे. ईश्वरप्पा यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख