कमळाचे चिन्ह असलेला मास्क घालून भाजपचा मंत्री मतदानाला पोचला अन्... - BJP minister wears mask with party symbol to polling booth in Bihar | Politics Marathi News - Sarkarnama

कमळाचे चिन्ह असलेला मास्क घालून भाजपचा मंत्री मतदानाला पोचला अन्...

वृत्तसंस्था
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज पहिल्या टप्प्यात 71 मतदारसंघात मतदान झाले. 

गया : भाजप नेते व बिहारचे मंत्री प्रेमकुमार आज मतदानाला सायकल चालवत गया येथील मतदान केंद्रावर पोचले. त्यांच्या या सायकलस्वारीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. मात्र, नंतर त्यांनी कमळाचे चिन्ह असलेला मास्क घालून एंट्री मारल्याचे समोर आल्याने मोठा गदारोळ झाला. या प्रकरणी ते आता चांगलेच अडचणीत आले आहेत. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. यातील पहिला टप्पा आज झाला असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा मतदारसंघ आहेत. 

प्रेमकुमार हे मतदान केंद्रावर कमळाचे चिन्ह असलेला मास्क घालून आल्याची दखल गयाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रेमकुमार यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. यामुळे प्रेमकुमार हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत. मतदानाला मास्क घालून जाणे त्यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. काँग्रेस बिहारमध्ये 70 जागा लढवत आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख