भाजपचे नेतृत्व नवीन मुख्यमंत्री निवडणार पण फायनल येडियुरप्पाच करणार - bjp legislative meet for new chief minister in karnataka-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

भाजपचे नेतृत्व नवीन मुख्यमंत्री निवडणार पण फायनल येडियुरप्पाच करणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जुलै 2021

कर्नाटकात मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा हे  पायउतार झाले आहेत. येडियुरप्पांची जागी कोण येणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) हे  पायउतार झाले आहेत. येडियुरप्पांची जागी कोण येणार, यासाठी भाजप आमदारांची आज  रात्री बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होणार असली तरी नाव अधिकृतरीत्या उद्याच (ता.28) जाहीर होईल, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. नवीन मुख्यमंत्री ठरवण्यात येडियुरप्पांची भूमिका महत्वाची ठरेल, असे संकेत पक्षातून मिळत आहेत.  

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेतृत्वाने पुढील मुख्यमंत्री ठरवण्यासाठी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी.किशन रेड्डी यांनी नेमले आहे. दोघेही केंद्रीय निरीक्षक बंगळूरमध्ये दाखल होत आहेत. या बैठकीला पक्षाचे प्रभारी अरुणसिंह हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक शहरातील हॉटेलमध्ये आज रात्री होणार आहे. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होईल. परंतु, नावाची घोषणा उद्या केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नवीन मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी पाठिंबा देण्याचे येडियुरप्पांनी आधीच जाहीर केले आहे. येडियुरप्पांचा पक्ष संघटनेतील प्रभाव पाहता येडियुरप्पांकडून नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाला संमती घेतली जाईल. येडियुरप्पांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यामुळे सरकारसह पक्ष संघटनेत नाराजीचे वातावरण आहे. यामुळे पक्ष नेतृत्वाने सावधपणे पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.  

हेही वाचा : सार्वजनिक जीवनात येडियुरप्पा 2009 नंतर थेट 2021 मध्येच रडले 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर येडियुरप्पा तातडीने राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. तिथे त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी येडियुरप्पांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांनी येडियुरप्पांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली आहे. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत येडियुरप्पा राज्याची धुरा सांभाळतील. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख