अग्नीपथवरुन एनडीएतच मतभेद; नितीशकुमार भाजपशी काडीमोड घेणार?

नितीशकुमार व भाजप यांच्या संबंधांमधील वाढत गेलेली दरी आता न बुजण्याच्या अवस्थेत पोहोचल्याची चिन्हे आहेत.
अग्नीपथवरुन एनडीएतच मतभेद; नितीशकुमार 
भाजपशी काडीमोड घेणार?
Narendra Modi, Nitish Kumar sarkarnama

नवी दिल्ली : जन्मापासूनच वादग्रस्त ठरलेल्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या 'अग्नीपथ' (Agneepath) योजनेला होणाऱ्या तरूणांच्या हिंसक विरोधाचे केंद्र बनलेल्या बिहारमधील (Bihar) नितीशकुमार (Nitish Kumar) सरकारवर भाजप (BJP) संतापला आहे. पंतप्रधानांच्या या योजनेविरूध्द होणारा हिंसाचार बिहार सरकारचे प्रशासन मूकदर्शक बनून पहात राहिल्याचा आरोप भाजपने केला, असून हे रोखले नाही तर 'गंभीर परिणाम' होतील असा जाहीर इशारा भाजपने स्वतःच्याच आघाडी सरकारला दिला आहे.

नितीशकुमार व भाजप यांच्या संबंधांमधील वाढत गेलेली दरी आता न बुजण्याच्या अवस्थेत पोहोचल्याची चिन्हे आहेत. अग्नीपथ योजनेमुळे बिहार-उत्तर प्रदेशसह १३ राज्यांत हिंसाचार उफाळला असून तो शांत होण्याची चिन्हे नाहीत. दर ४ वर्षांनी बेरोजगार होणाऱ्या ७५ टक्के, हजारो अग्नीवीरांचे समाधान होईल, असा तोडगा आणण्यात केंद्राला आजपावेतो यश आलले नाही. गृह, संरक्षण व विविध केंद्रीय मंत्रालये-त्यांचे मंत्री आणि भाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरक्षणांच्या घोषणांवर या भावी अग्नीवीरांचा अजिबात विश्वास नसल्याचे निरीक्षण जाणकार नोंदवतात.

नोटबंदी, जीएसटी, कोरोना लॉकडाऊनची घोषणा, सपशेल मागे घ्यावे लागलेले ३ कृषी कायदे अशी अनेक उदाहरणे पाहिली तर, 'एखादी वादग्रस्त योजना अचानक देशावर लादायची व ती रेटून नेण्याचे सर्व शक्तीने प्रयत्न करायचे हा या सरकारचा स्थायीभाव बनून गेल्याची टीका विरोधक करत आहेत. अग्नीपथ योजना राज्यांराज्यांतील जाळपोळीचा 'अग्निकाळ' बनविण्यास जबाबदार कोण? असाही सवाल विचारला जात आहे.

Narendra Modi, Nitish Kumar
नातीगोती, जुने 'राजकीय' संबंध जुळवा अन् किमान तीन मतं फोडा : आमदार लागले कामाला

बिहारमधील हिंसाचाराचे सत्र सुरूच असून भाजपचा नितीशकुमार यांच्यावरील संताप आता उघडपणे समोर आला आहे. बिहारमध्ये जास्त जागा जिंकूनही भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले तेव्हापासून राज्यात भाजप व संयुक्त जनता दलात वादाच्या ठिणग्या उडत होत्या. अग्नीपथच्या ज्वालांच्या रूपाने त्याचा वणवा होण्याची चिन्हे आहे. राज्यातील भाजप नेते पक्षकार्यालय व नेत्यांच्या घरांवरील हल्ले व जाळपोळ सुरू झाल्यानंतरही २ दिवस शांत होते.

बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जायस्वाल यांच्याही घरावर संतप्त तरूण चाल करून गेले व तोडफोड केली. तरीही काही न बोललेले जायस्वाल व इतर नेते आता उघडपणे बोलू लागले आहे. भाजप पक्षसंघटनेची सध्याची कार्यपध्दती पहाता याचा अर्थ बिहार भाजप नेत्यांना स्वतःच्याच आघाडी सरकारवर हल्लाबोल करण्यास 'दिल्लीतून' ग्रीन सिग्नल मिळाला असणार हे उघड आहे. बिहारमधील हिंसाचारावर नितीशकुमार यांच्याकडून एका वाक्याचीही प्रतिक्रिया आलेली नाही, याबद्दल दिल्लीतील भाजप नेत्यांमध्येही संताप आहे.

जायस्वाल यांनी, आंदोलक तरूणांच्या हिंसाचारात भाजप कार्यालयांवर व पक्षनेत्यांवर हल्ले होत आहेत. बिहार सराकर ते मूकपणे पहात आहे. हे निंदनीय व सहन होण्यासारखे नाही, असा इशारा दिला. ते म्हणाले बिहारमध्ये पोलिसांसमोर सारे काही घडत आहे. रेल्वेगाड्या, बसेस जाळल्या जात असताना प्रशासन नावाची चीजच दिसत नाही. प्रशासनाची स्थिती दयनीय आहे. या सरकारची नियत शंकास्पद आहे. प्रत्येक जिल्ह्यातील भाजप कार्यालये जाळली जात असताना पोलिस हातावर हात ठेवून बघत आहेत. हा हिंसाचार म्हणजे विचारपूर्वक केलेले कारस्थान आहे. जगातील ३० देशांत सैन्यभरतीच्या अशाच योजना राबबिल्या जात असताना भारतातच त्याला विरोध व त्यामुळे इतका हिंसाचार होणे हे संशयास्पद आहे.

आगामी राष्ट्रपतीपद निवडणुकीत विरोधकांच्या वतीने नितीशकुमार यांनाही उमेदवारीबाबत गळ घालण्यात आल्याचे सांगितले जाते. बिहार प्रशासनात भाजपचे वर्चस्व व हस्तक्षेप नितीशकुमार यांनी आजवर सहन केला. मात्र, आता त्यांचाही संयम सुटत चालल्याचे राजकीय जाणकार मानतात. बिहारमध्ये ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेपासूनच नितीशकुमार भाजप नेतृत्वावर नाराज असल्याचे दिसते. अशी जनगणना करण्यास भाजप नेतृत्वाचा म्हणजे मोदींचा तीव्र विरोध असल्याचेही सांगितले जाते.

Narendra Modi, Nitish Kumar
‘आप्पा, तुम्ही मला शिव्या घातल्या...’ दरेकरांच्या वक्तव्यावर ठाकूर म्हणाले, ‘प्रसादला नक्कीच...’

हा विरोध डावलून नितीशकुमार यांनी राज्यात जातीनिहाय जनगणना होणार अशी घोषणा करून टाकली त्यानंतर संयुक्त जनता दल व भाजपमधील मतभेदांची दरी रूंदावली. आता अग्नीपथ ला विरोधाच्या नावाखाली बिहारमध्ये जाळपोळ सुरू आहे. तरीही नितीशकुमार काहीही बोलत नाही व पोलिस कारवाई करत नाहीत हा भाजप नेत्यांचा आक्षेप आहे. या योजनेला विरोध करून देशाच्या विरोधात कार्यरत प्रवृत्तींना नितीशकुमार यांचा पाठिंबा मिळू नये व तसा तो मिळत नाही, अशी आमची अपेक्षा असल्याचे एका भाजप नेत्याने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in