मी सरकारला आधीच धोक्याचा इशारा दिला होता; उमा भारतींचा गौप्यस्फोट - bjp leader uma bharti says she had already warned government about uttarakhand tragedy | Politics Marathi News - Sarkarnama

मी सरकारला आधीच धोक्याचा इशारा दिला होता; उमा भारतींचा गौप्यस्फोट

वृत्तसंस्था
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

उत्तराखंडमधील जलतांडवाचे नेमके कारण शोधण्यास सुरवात झाली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी वेगळाच गौप्यस्फोट केला आहे. 

भोपाळ : उत्तराखंडमधील जलतांडवामागील नेमकं कारण काय याची चर्चा सुरू असताना भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी मोठा खुलासा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारमध्ये जलसंवर्धन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन या खात्याच्या जबाबदारी उमा भारतींवर होती. गंगा तसेच, तिच्या मुख्य उपनद्यांवर कोणताही प्रकल्प उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडत मी आधीच धोक्याचा इशारा दिला होता, असे त्यांनी म्हटले आहे. 

चमोली जिल्ह्यातील जोशी मठमधील रेनी गावाजवळ रविवारी हिमकडा कोसळला. त्यामुळे अलकनंदा व धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचानक मोठ्या प्रमाणात वाढली. नदीवर ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू होते. नदीला आलेल्या पूरामुळे हा प्रकल्प उध्वस्त झाला आहे. तपोवन धरणालगत सुरू असलेल्या कामावरील सुमारे 170 मजूर वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी 15 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत तपोवन परिसरातील बोगद्यांमध्ये आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. बोगद्यांमध्ये अद्याप 150 जण बेपत्ता असून, सर्वत्र गाळ पसरल्याने बवाचकार्यात अडथळे येत आहेत.

या दुर्घटनेवर उमा भारती यांनी ट्विट करीत त्यांची भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी शनिवारी उत्तरकाशीत होते. तेथून रविवारी मी हरिद्वारमध्ये दाखल झाले. उत्तराखंडमधील धरणांबाबत त्यावेळी माझ्या मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र सादर केले होते. हिमालय हा अत्यंत संवेदनशील परिसर आहे. त्यामुळे गंगा आणि मुख्य उपनद्यांलगत कोणताही वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येऊ नये. त्यामुळे १२ टक्के विजेचा तुटवडा निर्माण होणार असला तरी नॅशनल ग्रीडच्या माध्यमातून या विजेची गरज भागविता येईल.

या दुर्घटनेमुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. उत्तराखंड ही देवभूमी असून, तेथील जनता फार प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहे. चीनच्या सीमेच्या रक्षणासाठी ते नेहमी जागरूक असतात. मी या सर्वांच्या रक्षणासाठी प्रार्थना करते, असेही उमा भारतींनी म्हटले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख