गुन्हा दाखल होताच सुवेंदू अधिकारी तातडीने अमित शहांच्या दरबारी हजर

पश्चिम बंगालच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
bjp leader suvendu adhikari meets union home minister amit shah
bjp leader suvendu adhikari meets union home minister amit shah

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या (West Bengal) विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजप (BJP) नेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली.पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला दिसत आहे. यातच राज्य सरकारने अधिकारींवर नुकताच गुन्हाही दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते. 

पश्चिम बंगालमधील आधीच्या तृणमूलच्या सरकारमध्ये मंत्री असलेले अधिकारी यावर्षी विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये दाखल झाले होते. गृहमंत्री कार्यालयाने ट्विटरवर या भेटीची माहिती दिली आहे. तसेच, अधिकारी यांनीही या भेटीचे ट्विट केले. त्यांनी म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. केंद्र सरकारकडून बंगालसाठी मदत मागितली. बंगालच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. 

सुवेंदू अधिकारी यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर शहांबरोबरची ही पहिलीच भेट होती. अधिकारी यांनी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांचीही आज भेट घेतली. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अधिकारी यांनी तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राम मतदारसंघात पराभव केला होता. पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरही अधिकारी यांनी ही भेट घेतल्याची चर्चा आहे.  

सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर यास चक्रीवादळातील पीडितांना देण्यासाठी आणलेले साहित्य चोरल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. कोंटाई नगरपालिकेच्या व्यवस्थापन मंडळ सदस्य असलेल्या रत्नदीप मन्ना यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या तक्रारीत म्हटले आहे की, २९ मे रोजी हिमांशू मन्ना आणि प्रताप डे नावाच्या व्यक्तींनी नगरपालिकेच्या गोदामातून ताडपत्रींचा एक ट्रक चोरून नेला आहे. या प्रकरणात सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय सुरक्षा दलाची मदत आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुवेंदू अधिकारी, सौमेंदू अधिकारी, हिंमाशू मन्ना आणि प्रताप डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यातील प्रताप डे याला अटक करण्यात आली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com