ममतांना 50 हजार मतांनी न हरवल्यास राजकारण सोडणार; भाजप नेत्याचे चॅलेंज

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. ऐन रणधुमाळीत ममता बॅनर्जींनी मतदारसंघ बदलला असून, त्यांना भाजप नेत्याने आव्हान दिले आहे.
bjp leader suvendu adhikari challenges west bengal cm mamata banerjee
bjp leader suvendu adhikari challenges west bengal cm mamata banerjee

नंदिग्राम : पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी निवडणूक नंदिग्राममधून लढवण्याचे जाहीर केले आहे. याचवेळी पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ त्यांनी सोडला आहे. नंदिग्राममधूनच दहा वर्षांपूर्वी डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत ममतांनी सत्तांतर घडवले होते. आता तृणमूलमधूल भाजपमध्ये गेलेल्या सुवेंदू अधिकारींनी ममतांना आव्हान दिले आहे. 

ममतांनी नंदिग्राममध्ये प्रचारसभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. नंदिग्राम हा तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नंदिग्रामवर अधिकारी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. कधीकाळी तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती पण सुवेंदू यांनी बंडाचा झेंडा रोवत भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. 

‘वॉशिंग पावडर भाजप’ असा नारा देत ममतांनी येथून निवडणूक लढविली तरी भवानीपूरकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही, असे आश्‍वासन दिले होते. जाहीर सभेतच ममतांनी थेट उपस्थित जनसमुदायाला साद घालताना ‘मी येथूनच निवडणूक लढवू का?’ अशी विचारणा केली होती. त्यावर उपस्थितांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. केंद्रामध्ये रेल्वेमंत्री असताना नंदिग्राममध्ये केलेल्या विकासकामांचा पाढाही त्यांनी वाचून दाखविला होता. 

यावर सुवेंदू अधिकारींनी ममतांना थेट आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या पक्षाने मला नंदिग्राममधून तिकिट दिल्यास मी ममतांचा किमान 50 हजार मतांनी पराभव करेन. असे न घडल्यास मी राजकारण सोडेन. तृणमूलमध्ये ममता आणि त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांची एकाधिकारशाही आहे. याउलट भाजपमध्ये आधी चर्चा करुन उमेदवारीचा निर्णय घेण्यात येतो. माझ्या उमेदवारीबद्दलचा निर्णय पक्षच घेईल. 

राज्यामध्ये 2007 मध्ये डाव्यांची सत्ता असताना नंदिग्राममधील रसायन कारखान्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या आंदोलनानंतर 2011 मध्ये डाव्या आघाडीच्या ३४ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागून सत्तांतर झाले होते. त्यावेळी ममतांच्या विजयात नंदिग्रामचे महत्व अनन्यसाधारण होते. ममतांचे नंदिग्रामशी भावनिक नातेही आहे. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 14 लोक ठार झाले होते तेव्हा सर्वप्रथम घटनास्थळी पोचणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. या वेळी पोलिसांनी ममतांना रुग्णालयात जाण्यापासून रोखण्यात आले होते. 

नंदिग्राम हे माझ्यासाठी शुभ ठिकाण आहे. माझा पक्ष सोडून जे जात आहेत त्यांची मला फारशी चिंता नाही. जेव्हा तृणमूल काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा यापैकी कोणीही माझ्यासोबत नव्हते, असेही ममतांनी म्हटले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com