चिराग पासवान यांच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत भाजपने झटकले हात - bjp leader says lok janshakti party in now not part of nda in bihar | Politics Marathi News - Sarkarnama

चिराग पासवान यांच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत भाजपने झटकले हात

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचा राजकीय वारसा आता त्यांचे पुत्र चिराग यांच्याकडे आला आहे. चिराग यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक व केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्यानंतर त्यांचे पुत्र चिराग यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. याचबरोबर पासवान यांच्या पत्नी रीना यांना राज्यसभेवर घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यावर भाजपने आता हात झटकण्यास सुरूवात केली आहे. लोक जनशक्ती पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) नसल्याचे कारण पक्षाकडून पुढे करण्यात येत आहे.  

रामविलास पासवान (वय 74) यांचे 8 ऑक्टोबरला निधन झाले. त्यांच्यावर काल सरकारी इतमामात अंत्यसस्कार करण्यात आले होते. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र चिराग हे चालवत आहेत. पासवान यांनी स्थापन केलेल्या लोक जनशक्ती पक्षाची धुराही चिराग हेच सांभाळत आहेत. एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बिहारच्या विधानसभा निवडणुकीपुरता बाहेर पडला आहे. 

चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर संयुकत  जनता दलासोबत (जेडीयू) वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. चिराग यांनी भाजपला पाठिंबा आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.  
पासवान यांनी अनुसूचित जातींसाठी दलित सेना ही संघटना स्थापन केली होती. ही संघटना लोक जनशक्ती पक्षाशी संलग्न आहे. पासवान यांचे पुतणे प्रिन्स राज यांच्याकडे या संघटनेचे  नेतृत्व आहे. याआधी प्रिन्स यांचे पिता रामचंद्र पासवान या संघटनेची धुरा सांभाळत होते. या दलित सेनेने चिराग पासवान यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी केली आहे. 

या विषयी बोलताना दलित सेनेचे प्रवक्ते लल्लन चंद्रवंशी म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळात चिराग यांचा समावेश करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. याचबरोबर पासवान यांच्या पत्नी रीना यांना राज्यसभेवर घ्यावे, अशीही आमची मागणी आहे. पासवान यांचे खरे वारसदार चिराग हेच आहेत. आम्ही केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक आहोत. आता भाजपनेच आमच्या मागण्यांवर निर्णय घ्यायचा आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळात चिराग पासवान यांच्या समावेश कऱण्याच्या मागणीविषयी एका संकेतस्थळाशी बोलताना भाजपचे प्रवक्ते प्रेमरंजन पटेल यांनी लोक जनशक्ती पक्ष हा आता एनडीएचा घटक पक्ष नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करावयाचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अधिकार आहे. रामविलास पासवान हे राजकारणात यशस्वी होण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे त्यांचे कोणीही शत्रू नव्हते. त्यांचे विरोधकही त्यांचे शत्रू नव्हते. चिराग पासवान या उंचीपर्यंत पोचतील याबद्दल मी साशंक आहे. 

रामविलास पासवान यांच्या राज्यसभेच्या जागेवर त्यांच्या पत्नी रीना यांना उमेदवारी देण्याविषयी पटेल म्हणाले की, लोक जनशक्ती पक्ष बिहारमध्ये एनडीएचा घटक पक्ष नाही. याचबरोबर राज्यसभा निवडणुकीत घटक पक्षांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या जेडीयूचे म्हणणे राज्यसभेचा उमेदवार निश्चित करण्यासाठी महत्वाचे ठरेल.  

मागील वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात चिराग यांचा समावेश व्हावा, यासाठी रामविलास पासवान आग्रही होते. यासाठी त्यांनी स्वत:ला मंत्रिपद नको, अशी भूमिका घेतली होती. मात्र, भाजपने याला नकार दिला होता. केंद्रीय मंत्रिमंडळात दलित समाजाचा चेहरा असणारा मोठा नेता हवा, असे भाजपने त्यावेळी म्हटले होते. त्यामुळे चिराग यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश हुकला होता. आता मात्र, चिराग यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश व्हावा यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख