महिला नेत्याच्या आरोपावर भाजपचे नेते म्हणाले, तर मी राजकारणातून संन्यास घेईन! - bjp leader rakesh singh denies allegation of pamela goswami | Politics Marathi News - Sarkarnama

महिला नेत्याच्या आरोपावर भाजपचे नेते म्हणाले, तर मी राजकारणातून संन्यास घेईन!

वृत्तसंस्था
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

भाजपच्या नेत्यावर पक्षाच्या महिला नेत्याने आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. यावर या नेत्याने मौन सोडले आहे. 

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजप आता निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आल्याचे चित्र आहे. भाजपच्या महिला नेत्यालाच अमली पदार्थांसह अटक झाली आहे. या महिला नेत्याने या प्रकरणी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्ती व पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य राकेशसिंह यांना जबाबदार धरले आहे. यानंतर राकेशसिंह या प्रकरणी गोस्वामींना थेट आव्हान दिले आहे.  

राकेशसिंह यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे. राकेशसिंह म्हणाले की, माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. मी यात दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईन. भाजपला बदनाम करण्यासाठी तृणमूलने हा सापळा रचला आहे. गोस्वामी ही इतरही भाजप नेत्यांची नावे घेऊ शकते. उद्या ती तिच्या वडिलांवरही आरोप करु शकते. पोलिसांना या प्रकरणातील सत्य समोर आणायला हवे. 

मागील दोन वर्षांपासून मी पामेला गोस्वामीच्या संपर्कात नाही. माझा जर सहभाग असेल तर त्यांनी मला, कैलास विजयवर्गीय अथवा अमित शहांशी संपर्क साधायला हवा होता. पोलिसांनी गोस्वामांचे ब्रेनवॉश केले आहे. कोलकता पोलीस हे तृणमूल काँग्रेसच्या इशाऱ्यावर कारवाई करीत आहेत. माझ्याविरोधात कारस्थान रचण्यात आले आहे, असे राकेशसिंह यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : बंगालमध्ये भाजपला झटका...

भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य सरचिटणीस पामेला गोस्वामी यांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गोस्वामी, त्यांचा मित्र प्रबीर डे आणि सुरक्षा रक्षकासह दक्षिण कोलकत्यातील न्यू अलीपूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 100 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थांच्या तस्करीत काही काळापासून गोस्वामींचा सहभाग आहे. त्या अमली पदार्थांची खरेदी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून गोस्वामी त्यांचा साथीदार प्रबीर डे आणि सुरक्षारक्षकाला अटक केली. त्यांच्याकडून कोकेन जप्त करण्यात आले. 

गोस्वामी यांनी याचे खापर स्वपक्षातील अन्य सहकाऱ्यांवर फोडले आहे. भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्ती राकेशसिंह यांनीच माझ्याविरोधात हे कारस्थान रचले असून, त्यांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करावी, अशी मागणी गोस्वामींनी केली आहे. यामुळे भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले असून, पक्षातील ड्रग कनेक्शन समोर आले आहे. यामुळे राकेशसिंह यांच्यासह विजयवर्गीयही अडचणीत आले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख