पक्ष मला आमदाराच्या लायकीचेही समजत नाही; भाजप खासदाराचा घरचा आहेर

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने बिहारमध्ये प्रचारासाठी 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यावरुन वाद निर्माण झाला आहे.
bjp leader rajiv pratap rudy said party is not considering him of mla level
bjp leader rajiv pratap rudy said party is not considering him of mla level

नवी दिल्ली : बिहार  विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यात पंतपप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह 30 नेत्यांचा समावेश आहे. मात्र, या यादीतून गेली अनेक वर्षे पक्षाचा चेहरा असलेले खासदार राजीव प्रताप रूडी व शाहनवाज हुसेन यांची नावे गायब झाली आहेत. यावरुन रुडी यांनी उघड नाराजी व्यक्त करीत पक्ष नेतृत्वाला लक्ष्य केले आहे. 

मूळचे बिहारमधील असलेले आणि राष्ट्रीय स्तरावर छाप पाडणाऱ्या नेत्यांनाच भाजपने डावलल्याने पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बिहारच्या कोणत्याही निवडणुकीत भाजप प्रचारकांच्या यादी इतर नेत्यांची नावे बदलत मात्र,  रुडी आणि शाहनवाज यांची नावे कायम असत. गेल्या तीन-साडेतीन दशकांत पहिल्यांदाच या दोघांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळली गेली आहेत. वाजपेयी-अडवानी काळापासून भाजपबरोबर असलेले रूडी व शाहनवाज सध्या भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.

रुडी यांनी 1996 पासून व वयाच्या 25 व्या वर्षापासून भाजपकडून अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. रूडी सध्या दुसऱ्यांदा खासदार आहेत. मात्र 2019 मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचीही संधी नाकरण्यात आली. रूडी यांनी स्टार प्रचारकांमधून नाव वगळल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, बिहारच्या स्टार प्रचारकांच्या यादीत माझे नाव नसणे माझ्यासाठी दुःखाची बाब आहे. पक्षाने मला आमदाराच्याही लायकीचे समजले नाही. 

शाहनवाज यांना पक्षनेतृत्वाने बाजूला करुन वेगळा संदेश दिला आहे.  शाहनवाज यांना 2014 पूर्वी भाजपचा मुस्लिम चेहरा म्हटले जायचे. सिकंदर बख्त, मुख्तार अब्बास नक्वी व शाहनवाज असे निवडक मुस्लिम नेतेच भाजपमध्ये दीर्घकाळ राहिले आहेत. मात्र, सैय्यद जफर इस्लाम यांच्यासारखे नवे चेहरे आल्यावर आता शाहनवाज यांची पूर्वीइतकी गरज पक्षाला वाटेनाशी झाल्याचे सांगण्यात येते. 

या निवडणुकीत शाहनवाज यांना भागलपूरमधून तिकिटाबाबत विचारणा करण्यात आली होती. त्या प्रस्तावाबाबत त्यांनी उदासीनता दाखविल्यावर पक्ष नेतृत्वाने त्यांना आणखी बाजूला केल्याचे सांगितले जाते. शाहनवाज यांनी आपल्याला पक्षाचा हा निर्णय मान्य आहे, अशी प्रतीक्रिया दिली आहे. मात्र, मी अटलजींच्या नवरत्नांपैकी एक आहोत, अशी आठवणही त्यांनी करुन दिली आहे. शाहनवाज यांच्यापेक्षा बिहारच्या मुस्लिम मतदारांसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचाच करिष्मा पुरेसा असल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. 

अनेक आमदार, तसेच खासदार सुशील सिंह, आर.के.सिंह, विवेक ठाकूर, लालूप्रसादांच्या पक्षातून भाजपमध्ये आलेले मंत्री रामकृपाल सिंह यांच्यासारखे अनेक नवे चेहरे स्टार प्रचारक मानणाऱ्या भाजपने स्वतःच्याच राष्ट्रीय प्रवक्‍त्यांवर अविश्‍वास दाखविल्याची चर्चा सुरू आहे. राज्यातील प्रतिसादाच्या आधारावर भाजपने स्टार प्रचारकांच्या सभा बिहारमध्ये लावण्याचे ठरविले आहे. त्यात संरक्षणमंत्री राजनाथसिंह व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राजपूत-ठाकूरबहुल भागातून मागणी असल्याचे सांगितले जाते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com