बंगाल हिंसाचार : भाजपने थेट ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे - bjp leader moves supreme court against west bengal violence | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

बंगाल हिंसाचार : भाजपने थेट ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार उसळला असून, यावरुन भाजप आणि तृणमूलमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. 

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार उसळला असून, यात आतापर्यंत 12 जण ठार झाले आहेत. याची दखल घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे तातडीने दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यातच आता या प्रकरणी भाजपने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. (bjp moves supreme court against west bengal violence)

बंगालमधील पराभवानंतर बॅकफूटवर गेलेला भाजप पुन्हा एकदा फ्रंटफूटवर आला आहे. बंगालमधील हिंसाचाराचा मुद्दा भाजपने उचलून धरला आहे. भाजप नेते गौरव भाटिया यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बंगालमध्ये केंद्रीय संरक्षण दले तैनात करावीत आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. बंगालमधील हिंसाचाराची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी आणि राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे तातडीने दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर गेले आहेत. नड्डा यांनी राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा आढावा घेतला असून, हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिली आहे. कोलकत्यात आगमन झाल्यानंतर नड्डा म्हणाले की, पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालानंतर घडत असलेल्या घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहेत. मी भारताच्या फाळणीवेळी अशा घटना घडल्याचे ऐकले होते. भारत स्वतंत्र झाल्यापासून निकालानंतरची एवढी मोठी असहिष्णूता मी पहिल्यांदाच पाहत आहे. 

हेही वाचा : भाजप अॅक्शन मोडवर : मोदींचा राज्यपालांना फोन तर नड्डा तातडीने बंगालला

राज्यातील सहा जिल्ह्यांत झालेल्या हिंसाचारात 8 जणांची हत्या झाली असून, यात भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे, असा दावा भाजपने केला आहे. तृणमूल काँग्रेसने हा हिंसाचार केल्याचा आरोप भाजपने केला आहे.  दरम्यान, कोलकत्यात एक आणि सोनारपूरमध्ये एक असे दोन जण ठार झाले आहेत. तृणमूल काँग्रेसने मात्र, आपल्याच दोन कार्यकर्त्यांचा हिंसाचारात मृत्यू झाल्याचा दावा केला. आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगले आहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 212 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्ता स्थापन करीत आहेत. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली आहे.  

भाजप प्रचंड ताकदीने या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. परंतु, निकाल पाहता राज्यातील जनतेने भाजपला नाकारल्याचे दिसत आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख