आयटमला प्रत्युत्तर भंगारवाला...कमलनाथ यांच्या विरोधात इमरती देवी मैदानात

मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
bjp leader imarti devi compares congress leader kamal nath to ragpicker
bjp leader imarti devi compares congress leader kamal nath to ragpicker

भोपाळ : मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. माजी मंत्री व भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल बोलताना काँग्रेस नेते कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ उडाला आहे. कमलनाथ यांनी ज्या भाजपच्या उमेदवाराबद्दल वक्तव्य केले त्या इमरती देवींनी आता प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी कमलनाथांची तुलना भंगारवाल्याशी केली आहे. 

कमलनाथ यांनी जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री व भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. इमरती देवी उभ्या असलेल्या डाबरा मतदारसंघातील  सभेत बोलताना कमनाथ यांनी हे वक्तव्य केले होते. आमचा येथील उमेदवार तिच्यासारखा नाही...काय बरे तिचे नाव? असा सवाल कमलनाथ यांनी सभेला उपस्थित नागरिकांना केला होतो. त्यावेळी नागरिकांना इमरती देवी यांचे नाव घेण्यास सुरूवात केली. यावर कमलनाथ म्हणाले होते की, माझ्यापेक्षा तुम्ही तिला चांगले ओळखता. तुम्ही लोकांनी आधीच मला सावधगिरीचा इशारा द्यायला हवा होता. ये क्या आयटम है. 

याला आता इमरती देवी यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी कमलनाथ यांची तुलना भंगारवाल्याशी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भंगारवाले ज्याप्रमाणे दारु पिऊन बसतात आणि एखादी महिला जात असेल तर तिला आयटम म्हणतात, तशाच प्रकारचे कमलनाथ लोफर आहेत. ते लुच्चे आणि लफंगे आहेत. 

कमलनाथ यांनी केलेल्या  वादग्रस्त  विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. महिला उमेदवाराबद्दल असे विधान केल्याबद्दल कमलनाथ यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावर भाजपही आक्रमक झाला असून, कमलनाथ यांच्याविरोध भाजपने मोहीम उघडली आहे. यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अखेर जाहीर भूमिका घेऊन या प्रकरणी कमलनाथ यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणात निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. यामुळे कमलनाथ अडचणीत आल्याचे मानले जात आहे. याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले होते. कमलनाथ यांनी महिला उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, असे महिला आयोगाने म्हटले होते. या प्रकरणी भाजपनेही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com