पदाने नेता लहानमोठा होत नाही...नाराज मोदींची समजूत काढण्यासाठी गिरीराजसिंह सरसावले - bjp leader giriraj singh tries to pacify sushil kumar modi | Politics Marathi News - Sarkarnama

पदाने नेता लहानमोठा होत नाही...नाराज मोदींची समजूत काढण्यासाठी गिरीराजसिंह सरसावले

वृत्तसंस्था
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या एनडीएला विजय मिळाला होता. आधी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार यांची निवड झाली आहे. याचवेळी उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. 

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्रिपदी पुन्हा नितीशकुमार हेच असतील यावर आज शिक्कामोर्तब झाले. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी तारकिशोर प्रसाद यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा कायम असून, उपमुख्यमंत्रिपदी सुशीलकुमार मोदी राहणार की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 
 
बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली होती. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, डावे यांची महाआघाडी असे चित्र होते. एनडीने 125 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. याचवेळी महाआघाडीने 110 जागा मिळवल्या आहेत. 

राज्यात राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. दुसऱ्या क्रमांका वर 74 जागांसह भाजप आहे. जेडीयूला 43 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला 19 जागा आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. आता अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले आहे. 

सत्ता स्थापनेची चर्चा करण्यासाठी एनडीएची बैठक आज झाली. या बैठकीत मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार यांचे नाव निश्चित करण्यात आले. आज भाजपच्या आणि जेडीयूच्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत झालेल्या एनडीएच्या बैठकीत नितीशकुमारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उद्या (ता.१६) सायंकाळी ४.३० वाजता नितीशकुमार यांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भाजपने विधिमंडळ नेतेपदी तारकिशोर प्रसाद यांची निवड केली आहे. उपनेतेपदी रेणू देवी यांची निवड झाली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी या नावांचा घोषणा केली. भाजपने अद्याप उपमुख्यमंत्रिपदी कोण असेल याची घोषणा केलेली नाही. विधिमंडळ नेतेपदी प्रसाद यांची निवड झाल्याने तेच उपमुख्यमंत्री असतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, सुशीलकुमार मोदी यांच्याकडे दुसरी कोणती जबाबदारी द्यायची हा प्रश्न पक्षासमोर आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा आणखी वाढला असून, सुशीलकुमार मोदी यांनी थेट यावरुन पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की,भाजप आणि संघ परिवाराने माझ्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दित दुसऱ्या कोणाकडून मिळणार नाही एवढे दान दिले आहे. यापुढेही पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती पार पाडू. माझे कार्यकर्ता पद तर कोणी काढून घेऊ शकत नाही. 

यावर केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी मोदींची जाहीर समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आदरणीय सुशीलजी तुम्ही नेते आहात. उपमुख्यमंत्रिपद तुमच्याकडे होते आणि तुम्ही पुढेही भाजपचे नेते रहाल. पदाने कोणी नेता लहान मोठा होत नाही. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख