फडणवीस म्हणाले, सत्तांध नेत्यांना ही तर सणसणीत चपराक..! - bjp leader devendra fadnavis targets mva governement leaders | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस म्हणाले, सत्तांध नेत्यांना ही तर सणसणीत चपराक..!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने आणि अभिनेत्री कंगना राणावतला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. यावरुन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.  

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने आज दिलासा दिला आहे. याचबरोबर अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यावरील मुंबई महापालिकेची कारवाई उच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढले आहे. सत्तांध नेत्यांना ही सणसणीत चपराक बसली आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

या प्रकरणी सर्वोच्च अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता.  सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आज सविस्तर आदेश दिला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रद्द करावा या मागणीवर उच्च न्यायालय निर्णय दिल्यानंतर गोस्वामी यांच्यासह नितीश सारडा आणि फिरोज मोहम्मद शेख यांच्या अंतरीम जामिनाची मुदत चार आठवडे वाढवण्यात आली आहे.  

दरम्यान, अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे महापालिकेबरोबरच हा शिवसेनेलाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. 

आज एकाच दिवशी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा निर्णय राज्य सरकारच्या विरोधात गेला आहे. या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ते म्हणाले की, एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का? 

आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे, याचा विसर या राज्य सरकारला पडला. पोलीस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, त्यांच्या छळवणुकीसाठी नाहीत, हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सदसदविवेक बुद्धी-संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का, हा प्रश्न निर्माण होतो, असे त्यांनी म्हटले आहे. 

सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशाप्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख