तमिळनाडूत कमळ फुलवण्यासाठी भाजपची भिस्त करुणानिधींच्या पुुत्रावर..! - bjp leader amit shah will meet m k alagiri in tamilnadu visit | Politics Marathi News - Sarkarnama

तमिळनाडूत कमळ फुलवण्यासाठी भाजपची भिस्त करुणानिधींच्या पुुत्रावर..!

मंगेश वैशंपायन
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

तमिळनाडूत पक्ष विस्तार करण्यासाठी भाजपने आक्रमक धोरण आखले आहे. भाजपसाठी तमिळनाडून कितपत पोषक वातावरण आहे याचा अंदाज घेण्यासाठी खुद्द अमित शहा तेथे पोचले आहेत. 

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाने आता तमिळनाडूकडे लक्ष वळविले दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेची सुरुवात केली आहे. तमिळनाडूतील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज चेन्नईत दाखल झाले. शहा हे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे पुत्र एम. के.अळगिरी यांची भेट घेणार आहेत. या भेटीतून तमिळनाडूतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. 

शहा यांनी नुकताच पश्चिम बंगालचा दौरा केला होता. शहांच्या दौऱ्यानंतर बंगालमधील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. शहा यांच्या तमिळनाडू दौऱ्यामुळे सर्वच प्रादेशिक पक्ष सावध भूमिका घेत आहेत. विकास योजनांच्या उद्गाटनासाठी असलेल्या दौऱ्याची माहिती देताना स्वतः शहा यांनी, संघटनात्मक कामासाठी आपण चेन्नईला पोहोचलो असे ट्‌विटरवर जाहीर केले आहे. 

शहा हे या दौऱ्यात माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे पुत्र एम. अळगिरी यांच्याशी चर्चा करणार आहेत. एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकमध्ये अळगिरी यांना अडगळीत टाकण्यात आले आहे. ते लवकरच द्रमुक के (कलैग्नार) या नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत. त्यांच्या या पक्षाशी युती करण्याच्या दृष्टीने शहा-अळगिरींबरोबर चर्चा करतील, असे सांगण्यात येते.  

अळगिरी यांच्याशी युती झाली तर भाजपला त्याचा कितपत फायदा होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, द्रमुकला याचा नक्कीच फटका बसेल. द्रमुकला फटका बसल्यास याचा थेट फायदा अण्णाद्रमुकला होईल. याचबरोबर भाजपच्याही मतटक्‍क्‍यातही काहीशी वाढ होऊ शकेल. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकचे भाजपशी चांगले संबंध होते.  मात्र, मागील काही काळापासून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. 

केवळ नाईलाजाने अण्णाद्रमुक पक्ष केंद्रात भाजपबरोबर असल्याचे चित्र आहे. भाजपच्या वेल यात्रेवरून अण्णाद्रमुकच्या नेत्यांतील मतभेद समोर आले होते. ओ. पनीरसेल्वम यांच्या बंडखोरीमागे भाजपचे केंद्रीय नेतृत्व असल्याचे दिसले होते. भाजपच्या वेल यात्रेला दोन्ही द्रविडी पक्षांचा तीव्र विरोध आहे. कोरोनाचे निमित्त करून अण्णाद्रमुक सरकारने यात्रेवर बंदी घातली व अनेक भाजप नेत्यांना अटक केली तरी तरी भाजपने यात्रा पुढे रेटली असून, 6 डिसेंबरला या यात्रेच्या समारोपानिमित्त मोठा मेळावा घेण्याची भाजपची तयारी आहे. शहा आजच्या तमिळनाडू दौऱ्यात यासंदर्भातही चाचपणी करणार आहेत.

हिंदी व ब्राह्मणविरोधी द्राविडी पक्षांचे वर्चस्व राहिलेल्या या दक्षिणी राज्यात भाजपला अत्यल्प जनाधार आहे. शहा यांनी भाजपच्या तमिळनाडू पदाधिकाऱ्यांबरोबर बूथ पातळीवरील कामाचा आढावा घेतला. शहा यांच्या आगमनाबरोबरच तमिळनाडूतील राजकारणही तापले आहे. भाजपबरोबर केंद्रात सहमतीची युती असलेल्या सत्तारूढ अण्णाद्रमुकच्या एका गटाने भाजपच्या वेल यात्रेला पुन्हा विरोध केला आहे. 

शहा यांनी भाजपसाठी अतिशय आव्हानात्मक अशा पश्‍चिम बंगाल व तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी राज्यांकडे लक्ष वळविले आहे. तमिळनाडूतही पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख