अमित शहांचा रद्द दौरा, संतापलेला मटुआ समाज अन् भाजप नेत्यांची धावाधाव - bjp leader amit shah cancellation of west bengal visit upsets matua community | Politics Marathi News - Sarkarnama

अमित शहांचा रद्द दौरा, संतापलेला मटुआ समाज अन् भाजप नेत्यांची धावाधाव

वृत्तसंस्था
रविवार, 31 जानेवारी 2021

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. 

हावडा : पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री  अमित शहा हे आज पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु, नवी दिल्लीतील इस्राईलच्या दूतावासासमोर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बाँबस्फोटाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. त्यांचा हा दौरा रद्द झाल्याने राज्यातील मटुआ समाज संतापला आहे. यामुळे भाजप नेत्यांना मोठी धावाधाव करावी लागत आहे. 

अमित शहांचा दोन दिवसांचा बंगाल दौरा नियोजित होता. ते उत्तर 24 परगण्यातील ठाकूरनगरमध्ये मटुआ समाजाला संबोधित करणार होते. हा दौरा रद्द करण्यात आल्याने संतप्त झालेल्या मटुआ समाजाने भाजपचे खासदार शंतनू ठाकूर यांच्या घरासमोर समोर घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला. मटुआ समाज नाराज झाल्याने भाजप नेतृत्वाने तातडीने पक्षाचे उपाध्यक्ष मुकूल रॉय आणि सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांना तेथे पाठवले. 

रॉय आणि विजयवर्गीय यांनी मटुआ समाजाची समजूत काढून शहा हे पुन्हा दौऱ्यावर येणार आहेत, असे त्यांना सांगितले. बांगलादेशमधून भारतात स्थलांतरित झालेला हा समाज आहे. भारताच्या नागरिकत्वाची खात्री मिळावी यासाठी ते नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीची मागणी करीत आहेत. 

याबद्दल बोलताना मुकूल रॉय म्हणाले की, अमित शहांचा दौरा रद्द झालेला नसून तो पुढे ढकलण्यात आला आहे. त्यांच्या सभेसाठी उभारण्यात आलेला मंचही हटवण्यात येणार नाही. ते याच ठिकाणी येऊन सभा घेतील. काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील गोष्टी अचानक सामोऱ्या आल्यामुळे शहांना नाईलाजाने दौरा रद्द करावा लागला. 

दरम्यान, तृणमूल काँग्रेसने मात्र, यावरुन अमित शहांवर निशाणा साधला आहे. शहा हे आता पळ काढत आहेत, अशी टीका पक्षाचे नेते सुब्रत मुखर्जी यांनी केली. ते म्हणाले की, नागरिकत्व कायद्याबाबत सर्वांच्या शंकांचे समाधान शहा करणार होते. परंतु, आतापर्यंत ते याबद्दल जाहीरपणे काहीही बोललेले नाहीत. त्यांनी देशातील जनतेला त्यांनी अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलले आहे. 

अमित शहांसह अनेक नेत्यांनी सीएए लागू करण्याची घोषणा केली आहे. कोरोना लसीकरणाची मोहीम संपल्यानंतर सीएएची अंमलबजावणी केली जाईल, असेही भाजप नेते सांगत आहे. असे असले तरी विधानसभा निवडणुकीपूर्वी सीएएची अंमलबजावणी करण्याचा भाजपचा विचार नाही. कारण यामुळे इतर समाज घटक पक्षावर नाराज होऊन निवडणुकीत फटका बसू शकतो. पर्यायाने अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण होऊन सत्ताधारी तृणमूलला फायदा होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख