भाजपने स्वत:च्याच मुख्यमंत्र्यांना आणलं अडचणीत..?

कर्नाटकातील मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार संकटात सापडत चालले आहे. यामागे भाजपचे नेतृत्वच असल्याची चर्चा सुरू आहे.
bjp high command not take any action against ehswarappa
bjp high command not take any action against ehswarappa

बंगळूर : सरकारमधील मंत्र्यांचे सेक्स स्कँडल आणि नंतर मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करीत राज्यपालांकडे केलेली तक्रार यामुळे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांची डोकेदुखी वाढली आहे. या सर्व गदारोळात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटकातील भाजप सरकार संकटात सापडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मंत्र्याने उघड बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. यामुळे पक्षश्रेष्ठींच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम सुरू असल्याची चर्चा आहे. 

मुख्यमंत्री हे इतर मंत्र्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करीत आहे, असा गंभीर आरोप पंचायत राज मंत्री के.एस.ईश्वरप्पा यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या पत्राची प्रत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि कर्नाटकचे प्रभारी व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंह यांना पाठवली होती. 

यावर अरुणसिंह यांनी मात्र, मवाळ भूमिका घेत ईश्वरप्पांनी आधी मुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करायला हवी होती, अशी भूमिका मांडली. याचबरोबर ईश्वरप्पांनी मांडलेल्या मुद्द्यांवर काही राज्यांत सुरू असलेली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप करीत राज्यपालांकडे धाव घेणाऱ्या मंत्र्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे त्यांना पक्षश्रेष्ठींनी अभय दिल्याचे चित्र आहे. 

मागील काही काळातील घटना पाहिल्यास पक्षश्रेष्ठींना येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदी नकोत, हे स्पष्ट दिसू लागले आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात स्वपक्षाचे आमदार सातत्याने आघाडी उघडत आहेत. मुख्यमंत्र्यांना सीडीच्या नावाखाली ब्लॅकमेल केले जात आहे, असा आरोप काही आमदारांनी केला होता. ज्येष्ठ नेते व आमदार बसनगौडा पाटील यतनाळ हे तर मुख्यमंत्र्यांवर वारंवार हल्लाबोल करीत आहेत. यतनाळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असणारे आहेत. 

भाजपसारख्या पक्षात किरकोळ बेशिस्तीवरुन निलंबनाची कारवाई होते. मात्र, कर्नाटकातील प्रकार पाहता कारवाई तर दूरच उलट बेशिस्तीला प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे देशात सध्या काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर कर्नाटकमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागेल. येडियुरप्पांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्याचा शब्द दिला होत. तो शब्द ते किती पाळतात, हेसुद्धा पाहावे लागेल.  

ईश्वरप्पा यांच्या तक्रारीनंतर सरकारमधील मुख्यमंत्र्यांविरोधातील असंतोषाला तोंड फुटले आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक मंत्री आणि आमदारांची नाराजी आहे. येडियुरप्पा आणि ईश्वरप्पा हे दोघेही शिवमोगा जिल्ह्यातील आहेत. दोघांमध्ये याआधी अनेकवेळा भांडणे आणि समझोता होण्याचे प्रकार घडले आहेत. येडियुरप्पा पहिल्यांदा २००८ मध्ये मुख्यमंत्री झाले त्यावेळी ईश्वरप्पा यांचा त्यांना उघड विरोध होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com