भाजप अन् तृणमूल काँग्रेसच्या लढाईत आता 'आयपीएस' विरूद्ध 'आयपीएस'! - bjp fields ex ips officer bharati ghosh against tmc candidate and ex ips office humayun kabir | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

भाजप अन् तृणमूल काँग्रेसच्या लढाईत आता 'आयपीएस' विरूद्ध 'आयपीएस'!

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मार्च 2021

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने बंगालमध्ये उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात 57 जणांचा समावेश आहे. यात माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांचा समावेश आहे. त्यांना भाजपने देबरा मतदारसंघातून मैदानात उतरवले आहेत. येथून तृणमूल काँग्रेसकडून माजी आयपीएस अधिकारी हुमायूँ कबीर हे आधीच रिंगणात उतरले आहेत. 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे काल (ता.5) विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे, या यादीत भाजपच्या रॅलीदरम्यान 'गोली मारो'चे नारे देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना अटक केलेल्या माजी आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश आहे. हुमायूँ कबीर, असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांनी राजीनामा देऊन तृणमूलमध्ये प्रवेश केला होता.  भाजपनेही आज 57 उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली आहे. यातील माजी आयपीएस अधिकारी  भारती घोष यांच्या नावाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांना देबरा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. 

हेही वाचा : भाजपची पहिली यादी जाहीर : ममतादीदी विरुद्ध सुवेंदू अधिकारी 

तृणमूल काँग्रेसने हुमायूँ कबीर यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांना देबरा मतदारसंघातून तिकिट देण्यात आले आहे. मागील महिन्यांत त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले सुवेंदु अधिकारी यांनी 21 जानेवारीला एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीदरम्यान भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी 'गोली मारो' अशी घोषणाबाजी केली. त्यांना हुमायूँ कबीर या पोलिस अधिकाऱ्याने अटक केली होती. ते कोलकत्याजवळील चंदननगरचे पोलिस आयुक्त होते. आता त्यांच्या विरोधात भाजपने माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे बंगालमध्ये आयपीएस विरुद्ध आयपीएस असा सामना रंगणार आहे. 

तृणमूल काँग्रेसने काल (ता.5) 291 मतदारसंघांची उमेदवार यादी जाहीर केली. तृणमूलने त्यांच्या वाट्याला असलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली. तृणमूलने तीन जागा गोरखा जनमुक्ती मोर्चासाठी ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. ममता बॅनर्जी यांनी त्यांचा परंपरागत भवानीपूर मतदारसंघ सोडला असून, त्या नंदिग्राममधून लढणार आहेत. त्या 10 मार्चला नंदिग्राममधून अर्ज भरतील. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून, ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत 2016 मध्ये तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या, तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडून आले होते. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या वेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 18 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच  चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख