येडियुरप्पांना संपवण्याचा भाजप नेतृत्वाने बरोबर टाकला डाव!

कर्नाटकातील तिढा अखेर सुटला असला तरी येडियुरप्पांना पूर्णपणे निष्प्रभ करण्याच्या दिशेने भाजप नेतृत्वाने पावले टाकली आहेत.
bjp denied cabinet post to yediyurappa son vijayendra
bjp denied cabinet post to yediyurappa son vijayendra

नवी दिल्ली : कर्नाटकात (Karnataka) आज 29 मंत्र्यांनी शपथ घेतली पण यात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांचे (B. S.Yediyurappa) पुत्र बी.वाय.विजयेंद्र (B.Y.Vijayendra) यांचा समावेश नाही. येडियुरप्पांनी आग्रह धरूनही त्यांची मागणी पक्ष नेतृत्वाने डावलली आहे. येडियुरप्पांनी सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर नेमलेल्या सल्लागारांचीही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी उचलबांगडी केली आहे. येडियुरप्पांचा सरकारवरील प्रभाव पूर्णपणे दूर करण्यासाठी पक्षाने ही पावले उचलली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

येडियुरप्पांनी मुख्यमंत्री असताना सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर अनेक सल्लागारांची नियुक्ती केली होती. मुख्यमंत्री बोम्मई यांनी या सर्व सल्लागारांची उचलबांगडी केली आहे. बोम्मई यांचा 28 जुलैला शपथविधी झाल्यानंतर आठवडाभरातच त्यांनी सरकारमधील 19 जणांना बाहेरचा रस्ता दाखवला. याबाबतची अधिसूचना मनुष्यबळ विभागाने 1 व 2 ऑगस्टला काढली. येडियुरप्पांचा सरकारमधील प्रभाव संपवून टाकण्यासाठी ही खेळी नेतृत्वाने खेळली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बोम्मई हे मंत्रिमंडळाच्या यादीला दिल्लीतून मंजुरी घेऊन आज राज्यात परतले. त्यानंतर आज दुपारी शपथविधी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. शपथविधीच्या तासभर आधी ते येडियुरप्पांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांनी येडियुरप्पांशी काही काळ चर्चा केली. येडियुरप्पांनी पुत्राच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला होता. परंतु, पक्ष नेतृत्वाने याला महत्व दिले नसल्याचे समोर आले आहे. 

येडियुरप्पांचे पुत्र बी.वाय. विजयेंद्र यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नसल्याचे बोम्मई यांनी सांगितले. येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना विजयेंद्र हे सुपरसीएम असल्याची टीका मंत्रिमंडळातील सहकारी करीत होते. मुलामुळेच येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला, अशीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विजयेंद्र यांनी वगळून पक्ष नेतृत्वाने येडियुरप्पांना मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. याबद्दल बोम्मई म्हणाले की, मी केवळ सांगू शकतो की विजयेंद्र हे मंत्रिमंडळात नाहीत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी येडियुरप्पांशी याबाबत चर्चा केली आहे. याचबरोबर पक्षाचे प्रभारी अरुणसिंह यांनी खुद्द विजयेंद्र यांच्याशी चर्चा केली आहे. 

राजभवनात आज 29 मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नवीन मंत्र्यांना शपथ दिली. नव्या मंत्रिमंडळात 7 ओबीसी, 3 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 8 लिंगायत, 1 रेड्डी आणि 1 महिला आहे. नव्या मंत्रिमंडळात जातीय समतोल साधण्यावर भर देण्यात आला आहे. मंत्रिमंडळात 6 ते 8 नवीन चेहरे आहेत. याचबरोबर येडियुरप्पांचे समर्थक आणि विरोधकांनी समसमान प्रमाणात स्थान देण्यात आले आहे.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com