शशिकलांच्या पुनरागमनाने अण्णाद्रमुक 'मायनस'मध्ये तर भाजप 'प्लस'मध्ये? - bjp is delaying seat sharing of tamil nadu assembly election | Politics Marathi News - Sarkarnama

शशिकलांच्या पुनरागमनाने अण्णाद्रमुक 'मायनस'मध्ये तर भाजप 'प्लस'मध्ये?

वृत्तसंस्था
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

शशिकला या चार वर्षानंतर तमिळनाडूत परतल्या आहेत. त्यांच्या कमबॅकने राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे.  

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला या चार वर्षानंतर तमिळनाडूत परतल्या आहेत. त्यांच्या आगमनानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजप यांची आघाडी घोषित झाली आहे. असे असले तरी जागा वाटपासाठी भाजपकडून विलंब लावला जात आहे. यामागे शशिकलांच्या पुनरागमनाचे कारण असल्याचे समोर येत आहे.  

शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. 

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अण्णाद्रमुक आणि भाजपने आघाडीची घोषणा केली आहे. शशिकलांच्या सुटकेमुळे अण्णाद्रमुकमध्ये मोठी अस्वस्थता आहे. पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्यासमोर पक्ष एकत्रित ठेवण्याचे आव्हान आहे. यामुळे सुरवातीला आघाडीसाठी आढेवेढे घेणारे हे दोन्ही नेते भाजपशी आघाडी करण्यास तयार झाले होते. 

हेही वाचा : शशिकलांच्या सुटकेनंतर धास्तावलेले मुख्यमंत्री म्हणाले...

शशिकलांच्या सुटकेनंतर पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांची डोकेदुखी वाढली आहे. पक्षाचे अनेक नेते उघडपणे शशिकलांचे समर्थन करीत आहेत. शशिकलांमुळे पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा फायदा भाजपने घेण्यास सुरवात केली आहे. विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप करण्यास भाजपकडून विलंब लावला जात आहे. शशिकलांमुळे अण्णाद्रमुकच्या अडचणी आणखी वाढल्यानंतर दबाव टाकून जास्त जागा पदरात पाडून घेण्याची भाजपची रणनिती आहे. यामुळेही अण्णाद्रमुकमध्ये नाराजी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

जागा वाटपाला भाजपकडून होत असलेल्या विलंबाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते एच. राजा म्हणाले की, अद्याप विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. जागा वाटपाची चर्चा करण्यास अद्याप खूप कालावधी नाही. जागा वाटपाची चर्चा व्यवस्थित होईल आणि योग्य वेळी ते जाहीर होईल. मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे या वेळी जागा वाटप होईल. 

शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख