पक्षांतर्गत दुफळीने भाजपची डोकेदुखी वाढली; नड्डांच्या निवासस्थानी तातडीची बैठक

मागील काही दिवसांपासून कोलकत्यातील भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत.
bjp core committee meeting taking place at j p nadda residence
bjp core committee meeting taking place at j p nadda residence

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये तिकिट वाटपाच्या मुद्द्यावरुन भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पक्ष कार्यालयाबाहेरच भाजप कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून आंदोलन करीत असल्याचे चित्र आहे. पक्षातील या दुफळीची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली असून, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर आजच केंद्रीय निवडणूक समितीची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.  

भाजपने तिकिट दिलेल्या उमेदवारांमध्ये तृणमूल काँग्रेसमधील आयात उमेदवारांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे पक्षातील निष्ठावंत नाराज झाले आहेत. कोलकत्यातील भाजप कार्यालयाबाहेर तिकिट वाटपावरून नाराज झालेले कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. काही जागांवर पक्षाने दिलेले उमेदवार मान्य नसल्याने हे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांकडून दगडफेकीसह नेत्यांना धक्काबुक्की करण्याचे प्रकार सुरू आहेत. 

याची गंभीर दखल पक्षाच्या नेतृत्वाने घेतली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सुरु आहे. बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक होत आहे. यातील पहिल्या चार टप्प्यांचे उमेदवार जाहीर झाले असून, उरलेल्या चार टप्प्यातील उमेदवार भाजपकडून अद्याप जाहीर झालेले नाहीत. या यादीबाबत आणि राज्यातील पक्षांतर्गत असंतोषावर कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा सुरू आहे. या बैठकीला ज्येष्ठ नेते मुकुल रॉय, दिलीप घोष, अमित मालवीय, कैलास विजयवर्गीय आदी उपस्थित आहेत. उरलेल्या चार फेऱ्यांतील मतदारांच्या यादीवर आज होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीतही चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज होईल. 

तिकिट वाटपावरून नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी 15 मार्चलाही पक्षाच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. काल पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय, अर्जुनसिंह आणि शिव प्रकाश यांना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोलकत्यात आले होते. त्यावेळीही भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  याचबरोबर लोखंडी बॅरिकेडही कार्यालयाबाहेर उभे करण्यात आली आहेत. 

कार्यकर्त्यांनी काल (ता.16) पक्ष कार्यालयाबाहेर घोषणाबाजी सुरू केली. यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक सुरू केली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. कार्यालयातील नेत्यांना पोलिसांनी संरक्षक कडे करुन बाहेर काढावे लागले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com