सरकारला घरचा आहेर देणाऱ्या आमदारावर प्रदेशाध्यक्षांकडून फुलांचा वर्षाव

उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारला घरचा आहेर देणाऱ्या भाजपआमदारावरुन मोठा गदारोळ उडाला आहे.
up bjp chief swatantra dev singh showers petal on mla surendra singh
up bjp chief swatantra dev singh showers petal on mla surendra singh

बलिया : भाजपच्या एका स्थानिक नेत्याने एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणात आरोपी नेत्याचे समर्थन करीत भाजपचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी तपास यंत्रणांसह  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारला दोषी धरले होते. याची दखल घेऊन भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांना नोटीस बजावली होती. आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच या आमदारावर कारवाईऐवजी फुलांचा वर्षाव केल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.  

भाजप नेते धिरेंद्रप्रतापसिंह यांनी बलिया जिल्ह्यात 16 ऑक्टोबरला एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली होती. सरकारी कोट्यातील दुकानांचे वाटप करण्यासाठी आयोजित बैठकीतच या नेत्याने गोळीबार केला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी धिरेंद्र यांना अटक केली आहे. या प्रकरणी प्रशासनाने एकतर्फी भूमिका घेतल्याचा आरोप आमदार सुरेंद्रसिंह यांनी केला होता. त्यांनी म्हटले होते, की बलियामध्ये घडलेली घटना गंभीर आहे. ती घडायला नको होती परंतु, प्रशासनाकडून या प्रकरणात सुरू असलेल्या एकतर्फी तपासाचा मी निषेध करतो. या घटनेत जखमी झालेल्या सहा महिलांबद्दल कोणीही बोलत नाही. धिरेंद्रसिंह यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला होता. 

धिरेंद्र हे माझे निकटवर्ती सहकारी हे मी कसे नाकारू शकतो? ते भाजपचेही निकटवर्ती आहेत. त्यांचे कुटुंबीय पक्षाला मते देण्यापासून निवडणुकीत पक्षाचे काम करीत आहेत. पक्षासाठी मतदान करणारा प्रत्येक जण हा पक्षासाठी जवळचाच आहे. यामुळेच या घटनेच्या एकतर्फी तपासाचा मी निषेध केला आहे, असे सुरेंद्रसिंह यांनी म्हटले होते. 

भाजपच्या आमदारानेच राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्याने विरोधकांच्या हाती आयतेच कोलित सापडले होते. राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवरुन विरोधक सरकारला लक्ष्य करीत आहेत. यातच भाजप आमदाराने सरकारला घरचा आहेर दिला आहे. याची गंभीर दखल पक्ष नेतृत्वाने घेतली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह यांनी सुरेंद्रसिंह यांना नोटीस बजावून त्यांना तातडीने पाचारण केले होती. सुरेंद्रसिंह यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता होती. 

प्रत्यक्षात मात्र, उलटेच घडल्याचे समोर आले आहे. सिंकदरपूर येथील एका गावात कृष्ण मंदिराच्या भूमिपूजनावेळी स्वतंत्रदेवसिंह आणि सुरेंद्रसिंह यांची भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात स्वंतत्रदेवसिंह हे सुरेंद्रसिंह यांच्यावर फुलांचा वर्षाव करताना दिसत आहेत. सुरेंद्रसिंह दोन्ही हात जोडून याचा स्वीकार करीत असल्याचेही दिसत आहे.  

कायम वादाच्या भोवऱ्यात असलेले सुरेंद्रसिंह 

हाथरसमधील अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेशातील भाजप सरकार अडचणीत आले होते. त्यावेळी भाजपचे बैरिया मतदारसंघातील आमदार सुरेंद्रसिंह यांनी वाद ओढवून घेतला होता. त्यांनी म्हटले होते की, पालकांनी मुलींवर संस्कार केल्यास बलात्कारच होणार नाहीत. बलात्कारासारख्या घटना केवळ संस्कारातून थांबू शकतात. शिक्षा अथवा तलवारीने असे प्रकार थांबू शकत नाहीत. सर्व माता-पित्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या तरुण मुलींना संस्कारी वातावरणात शालिनतेने वागणे शिकवायला हवे. 

सरकारचा धर्म हा संरक्षण करणे हा असून, कुटुंबाचा धर्म हा मुलांना चांगली मूल्ये शिकवणे हा आहे. सरकार आणि चांगली मूल्ये यांच्या संयोगातून आपण देश सुंदर बनवू, असेही सिंह यांनी म्हटले होते. सिंह यांच्या विधानावरुन सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात लक्ष्य झाले होते. मुलींवर संस्कार करायला शिकवण्याऐवजी मुलांवर योग्य संस्कार व्हायला हवेत, हे आधी आमदारांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्यांना सोशल मीडियावर देण्यात आला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com