भाजपसाठी इकडे आड अन् तिकडे विहीर...मोदींच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक सुरू

बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राजकीय पक्षांची आघाड्यांची जुळवाजुळव सुरू असताना त्यात बिघाडी होण्याचेच प्रकार सध्या सुरू आहेत. अखेर एनडीएमध्ये फूट पडली आहे.
bjp central election committe meet starts in presence of pm narendra modi
bjp central election committe meet starts in presence of pm narendra modi

नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र अपेक्षित होते. मात्र, आज केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या एलजेपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बोलावण्यात आली आहे. 

यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीवेळी सहकारी असलेले पक्ष आता विरोधात मैदानात आहेत. मागील वेळी लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जेडीयू आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र होते. त्यावेळी भाजपने एलजेपी, राष्ट्रीय लोकसमता पक्षासोबत आघाडी केली होती. मागील निवडणुकीच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए)  विजय झाला होता. या विजयानंतर काही महिन्यांमध्येच नितीश यांनी लालूंच्या पक्षाची साथ सोडत भाजपसोबत आघाडी केली होती. यामुळे विरोधी बाकांवरील भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष सत्तेत आला होता. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. आधी या महाआघाडीचे घटक असलेले जितनराम मांझी आता एनडीएमध्ये गेले आहेत. याचवेळी एनडीएमधील एलजेपीने वाढीव जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरला होता. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी जास्त जागा मिळाव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे एनडीएचे जागावाटप लांबत चालले होते. 

या पार्श्वभूमीवर एलजेपीच्या नेत्यांच्या बैठक आज पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रामविलास पासवान या वेळी उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीनंतर पक्षाने निवेदन जाहीर केले आहे. यात म्हटले आहे की, राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत आमची भक्कम आघाडी आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर आमचे जेडीयूसोबत वैचारिक मतभेद आहेत. यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीनंतर आमचे विजयी उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर भाजपसोबत असतील. 

बिहारमध्ये जेडीयूच्या उमेदवार ज्या मतदारसंघात असेल तेथे विरोधात एलजेपी उमेदवार देणार आहे. मात्र, राज्यात भाजपचा उमेदवार असेल तेथे विरोधात उमेदवार न देता पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार बनावे, असे एलजेपीने म्हटले आहे. एलजेपीने आता विरोध केला असला तरी निकालानंतर  भाजपसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. एलजेपीच्या या भूमिकेमुळे नितीशकुमार  आणि भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत. 

आता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची तातडीची बैठक दिल्लीत सुरू झाली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, शहनवाज हुसेन आणि बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित आहेत. एलजेपीने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची भूमिका घेतल्याने भाजपची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. 

एलजेपीने एकाच वेळी भाजपला पाठिंबा देण्याची आणि जेडीयूला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे आघाडी म्हणून जनतेसमोर जाण्याचा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. कारण जेडीयू आणि एलजेपीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात असतील. त्यातील एकाला पाठिंबा देणे अथवा विरोध करणे पक्षाला शक्य नाही. यामुळे पक्षाची गोंधळलेली अवस्था होण्याची शक्यता आहे. यातूनत जनतेपर्यंत चुकीचा संदेश जाऊन एनडीएवरील आत्मविश्वास कमी होऊ शकतो, असा धोका भाजप नेतृत्वाला वाटत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com