bjp and jdu are trying to claim developments work in bihar | Sarkarnama

बिहारच्या विकासाचे श्रेय घेण्यासाठी भाजपचे कुरघोडीचे राजकारण

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

बिहारचा विकास झाला नसल्याचा दावा विरोधक कितीही करीत असले तरी राज्यातील सत्ताधारी जेडीयू आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये विकासाचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. 

पाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर नसल्या तरी राजकीय वातावरण मात्र, तापले आहे. राज्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाचे सरकार आहे. आता बिहारचा जो काही विकास सरकारच्या काळात झाला असेल त्याचे श्रेय मुख्यमंत्री नितीशकुमार यांना जाऊ नये यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यामुळे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिंगणात उतरून  विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. याचवेळी विरोधक मात्र, विकास झालेला नसताना सुरू असलेल्या श्रेयवादाच्या खटाटोपावर टीका करीत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये तीन दिवसांत ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक योजनांचे भूमिपूजन आणि उदघाटन केले आहे. मोदी यांनी पाटणा, मुजफ्फरपूर, मुंगेर व छापरातील ‘नमामि गंगे’शी संबंधित ५४३ कोटी रुपयांच्या योजनेचे उदघाटन आज केले. पंतप्रधानांचे सर्व कार्यक्रम व्हर्चुअल पद्धतीने होत आहे. आता येत्या १८, २१ व २३ सप्टेंबरलाही त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी बिहारच्या विकासकामांचे उदघाटन करण्याचा धडाका लावला आहे. याचा वेग पाहता बिहारच्या विकासाचे श्रेय घेण्यासाठी भाजपने आक्रमक पावले उचलण्यास सुरूवात केले असल्याचे स्पष्ट होत आहे. 

‘नमामि गंगे’ योजनेअंतर्गत बिहारमधील योजनेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्च्युअल पद्धतीने केले. या वेळी त्यांनी नितीशकुमार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, बिहारमध्ये वेगाने बदल होत आहे. येथे शिक्षण संस्था सुरू करण्याची गरज नाही, अशी धारणा पूर्वी होती. यामुळे राज्यातील युवक मोठ्या प्रमाणात बाहेर गेले. बिहारच्या डोक्यावरील कर्ज मी उतरवेन. 

राज्याच्या विकासाचे सारे श्रेय केवळ मुख्यमंत्री नितीशकुमार यांना जाऊ नये, अशी रणनिती भाजपकडून आखली जात आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व बिहारचे निवडणूक प्रभारी व देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केलेले वक्तव्य या दृष्टीने बोलके आहे. ते म्हणाले होते की, नितीश आणि सुशील यांच्या जोडीने बिहारमध्ये बदलाचे वारे आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिहारचा विकास व्हावा, असे मनापासून वाटत असल्यानेच हे सर्व शक्य झाले. 

बिहारच्या विकासाचे सारे श्रेय आधी नितीशकुमार यांच्याकडे जात होते. हे चित्र पुसून टाकत या विकासात वाटेकरी असल्याचे दाखवून देण्यास भाजपने सुरुवात केली आहे. भाजपची या राजकीय खेळीमुळे नितीशकुमारांची कोंडी झाली आहे. मात्र, त्यांना उघडपणे याबद्दल काही बोलता येत नसल्याचे चित्र आहे. मात्र, जेडीयूचे नेते याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख