भाजपला धक्का : अमित शहांची पाठ फिरताच सहकारी पक्षाची वेगळी वाट - bjp ally in puducherry all india n r congress is not willing to form alliance | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपला धक्का : अमित शहांची पाठ फिरताच सहकारी पक्षाची वेगळी वाट

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मार्च 2021

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची पाठ फिरताच भाजपच्या सहकारी पक्षाने साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

चेन्नई : पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार पडले असून, ते पाडण्यास कारणीभूत असलेले बरेचसे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या राजकीय नाट्यासाठी भाजपशी हातमिळवणी केलेल्या ऑल इंडिया एन.आर.काँग्रेस या पक्षाने भाजपची साथ सोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुदुच्चेरी दौऱ्यात केलेली वक्तव्ये यासाठी कारणीभूत ठरली आहे. शहांची पाठ फिरताच पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या केंद्रशासित प्रदेशात नवे राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता आहे. 

अमित शहांनी नुकताच पुदुच्चेरीचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पुढील सरकार भाजपचेच असेल, असे वक्तव्य केले होते. यामुळे ऑल इंडिया एन. आर. काँग्रेस (एआयएनआरसी) हा पक्ष नाराज झाला आहे. पुदुच्चेरीचे माजी मुख्यमंत्री एन. रंगासामी हे या पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत भाजपने घेतलेल्या भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली. 

हेही वाचा : एकच आमदार असलेल्या राज्यात भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर

या बैठकीला उपस्थित नेत्यांनी पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. भाजप आघाडीची चर्चा करताना 'एआयएनआरसी'चे नेतृत्व राहील, असे म्हणत आहे. परंतु, त्यांचे नेते भाजपचाच मुख्यमंत्री असेल असे सांगून वेगळा संदेश जनतेत देत आहेत, असा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला.  त्यामुळे भाजपशी आघाडी नको, असा सूर बैठकीत उमटला. 

पुदुच्चेरीतील व्ही. नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार नुकतेच पडले. त्यानंतर राजकीय पुनरागमन करण्यासाठी 'एआयएनआरसी' प्रयत्नशील आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका विधानामुळे पक्ष नाराज झाला आहे. पुदुच्चेरीतील कराईकल येथे रविवारी प्रचारसभेत शहा यांनी भाजप सरकार स्थापन करेल, असा दावा केला होता. भाजपनंतर दुय्यम भूमिका स्वीकारण्यास 'एआयएनआरसी'ची तयारी नाही. 

हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये 3 मे रोजी भाजपचाच मुख्यमंत्री दिसेल 

तमिळनाडू राज्यात भाजप आणि अण्णाद्रमुक या पक्षांची आघाडी झाली आहे. पुदुच्चेरीत हेच घडण्याची अपेक्षा आहे. अशावेळी 'एआयएनआरसी'समोर द्रमुकची साथ घेणे किंवा स्वबळावर लढणे असे दोनच पर्याय शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, द्रमुकचे नेते एस. जगतरक्षकन यांनी पक्ष पुदुच्चेरीत सत्ता पटकावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, असे विधान केले होते. त्यामुळे हा पक्ष काँग्रेसशी युती कायम ठेवणार की 'एआयएनआरसी' बरोबर आघाडी करणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख