संजय राऊत म्हणाले, अशीही बिहारची जनता त्यांना रिटायरच करणार होती! - bihar people will retire nitish kumar in this election says sanjay raut | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊत म्हणाले, अशीही बिहारची जनता त्यांना रिटायरच करणार होती!

वृत्तसंस्था
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज अखेरच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. 

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. परंतु, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ही शेवटची निवडणूक असेल, अशी घोषणा करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांच्या निवृत्तीची चर्चा त्यांच्याच संयुक्त जनता दलाने (जेडीयू) फेटाळून लावली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी नितीशकुमारांना लक्ष्य केले आहे.  

पूर्णिया जिल्ह्यात नितीशकुमार यांची 5 नोव्हेंबरला जाहीर सभा होती. ही माझी शेवटची निवडणूक असेल...शेवट चांगला तर सगळेल चांगले, असे नितीशकुमार म्हणाले होते. यावरुन विरोधी पक्षांनी नितीशकुमारांवर हल्लाबोल केला आहे. नितीशकुमारांना पराभव समोर दिसू लागल्याने अशा प्रकारच्या घोषणा करुन जनतेची फसवणूक केली जात आहे, अशी टीका होत आहे. 

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी नितीशकुमार यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, नितीश हे खूप मोठे नेते आहेत. त्यांची कारकिर्द आता संपत आली आहे. कुणी नेता म्हणत असेल की, हा माझी शेवटची निवडणूक आहे तर त्यांना सन्मानाने निरोप द्यायला हवा. बिहारची जनताही त्यांनी निरोप देण्याच्या संधीचीच वाट पाहत होती. या निवडणुकीपासून जनता त्यांना रिटायर करेल. 

दरम्यान, जेडीयूचे ज्येष्ठ नेते वसिष्ठनारायण सिंह यांना नितीशकुमारांच्या निवृत्तीची चर्चा फेटाळून लावली आहे. मागील तीस वर्षांपासून ते नितीशकुमारांसोबत आहेत. ते जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष असून, राज्यसभेचे सदस्यही आहेत. नितीशकुमारांचे पूर्ण भाषण न ऐकता सगळ्यांनी असा अर्थ काढला आहे, असा दावा वसिष्ठनारायण सिंह यांनी केला. नितीशकुमारांच्या निवृत्तीची चर्चा त्यांनी फेटाळून लावली. 

वसिष्ठनारायण सिंह म्हणाले की, राजकीय अथवा सामाजिक कार्यकर्ता कधी निवृत्त होतो का? नितीशकुमार हे स्वत: विधानसभा निवडणूक लढवत नाहीत. मुख्यमंत्री हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. पूर्ण भाषण न ऐकता आणि संदर्भ समजून न घेता विरोधकांना अर्थ काढण्यात आनंद वाटत असेल तर मी काही करु शकत नाही. प्रत्यक्षात ती नितीशकुमारांची या निवडणुकीतील शेवटची सभा होती. प्रचाराच्या मुदत संपण्यास काही मिनिटेच राहिली असताना ते बोलत होते. या गोष्टींचा संदर्भ यामागे होता. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा 3 नोव्हेंबरला झाला असून, यात ९४ मतदारसंघ होत. तिसरा टप्पा आज सुरू असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख