बिहारच्या रणांगणात ज्येष्ठ नितीशकुमार विरुद्ध तरुण चिराग पासवान - Bihar CM is stopped envisioning policies and become saturated says Chirag Paswan | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारच्या रणांगणात ज्येष्ठ नितीशकुमार विरुद्ध तरुण चिराग पासवान

वृत्तसंस्था
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय लोक जनशक्ती पक्षाने घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. 

नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून  (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी देश पातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी घेतली आहे. चिराग यांनी आज नितीशकुमार यांना लक्ष्य केले असून, तरुणांच्या हाती सूत्रे मिळावीत अशी भूमिका घेतली आहे. यामुळे ज्येष्ठ विरुद्ध तरुण असा वाद बिहारमध्ये सुरू झाला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक भाजप नेत्यांनी एलजेपीमध्ये प्रवेश केला आहे. यातील बहुतांश नेत्यांचे मतदारसंघ हे जागावाटपात एनडीएकडे गेले आहेत. भाजप नेते पक्षांतर करीत असताना भाजप नेतृत्व याकडे काहीच घडत नसल्याप्रमाणे पाहत होते. तसेच, यावर काही प्रतिक्रियाही देताना दिसत नव्हते. नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे भाजप म्हणत आहे. भाजपकडून संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) विरोधात राजकारण सुरू आहे, अशी चर्चा सुरू आहे.  

चिराग यांनी नितीशकुमार यांच्यावरील हल्लाबोल कायम ठेवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टी ठेवणारी धोरणे गुंडाळून ठेवली आहेत, असे मला वाटते. ते तरुण नेत्यांना नाकारतात. तरुण नेत्यांची अनुभव नसलेले अशी खिल्ली ते उडवतात. स्वत: जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून तरुणपणीच पुढे आलेल्या नेत्याने तरुणांना कमी लेखावे हे चुकीचे आहे. आम्हा तरुणांनाही जाण आहे आणि आम्हीही बिहारच्या भल्याचा विचार करु शकतो. राज्यातील जनतेले आधीच तुम्हाला 15 वर्षे दिलेली आहेत. 

चिराग हे स्वत:ला युवा बिहारी असे म्हणवून घेतात. याचबरोबर त्यांच्या ट्विटरवर हँडलवर युवा बिहारी असे संबोधन आहे. नितीशकुमार मात्र, चिराग यांची अननुभवी तरुण नेते अशी खिल्ली उडवत. त्यामुळे नितीश यांनीच तरुणपणी राजकारणात प्रवेश केल्याचा दाखला चिराग यांनी दिला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात आता ज्येष्ठ विरुद्ध तरुण हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. 

चिराग पासवान हे स्वतंत्रपणे लढणार असून, ते जेडीयूच्या विरोधात उमेदवार उभे करणार आहेत. यामुळे ते प्रामुख्याने जेडीयूची मते खातील. मात्र, ते भाजपला पाठिंबा देणार आहेत. यामुळे भाजपला फायदाच होणार आहे. याचवेळी जेडीयूकडे जागावाटपात गेलेल्या मतदारसंघांतील नेते एलजेपीमध्ये गेले आहेत. यामुळे या सगळ्या घटनाक्रमाकडे संशयाने पाहिले जात आहे. नितीश यांच्या जागा कमी करण्यासाठीच भाजपने चिराग पासवान यांना स्वबळाची चूल मांडण्यास सांगितले, अशीही चर्चा सुरू आहे. 

चिराग यांच्या भूमिकेमुळे भाजप आणि जेडीयूमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. यामुळे भाजप नेत्यांनी अखेर चिराग यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. चिराग यांना आता भाजप नेते थेट लक्ष्य करु लागले आहेत. चिराग यांचा भाजपशी कोणताही संबंध नसल्याचे पक्षाचे नेते उघडपणे सांगू लागले आहेत. 

चिराग पासवान यांना भाजपचीच फूस असल्याची उघड चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सत्ताधारी एनडीएमध्ये तणाव निर्माण झाला आहे. आता चिराग पासवान यांच्या विरोधात भाजपला कठोर भूमिका घ्यावी लागली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत चिराग पासवान यांच्याविरोधात थेट बोलणे टाळले होते. चिराग यांच्या या विधानाने भाजप नेत्यांची आणखीनच कोंडी झाली आहे. चिराग यांना काय उत्तर देणार हाच मोठा प्रश्न भाजप नेत्यांना पडला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख