मित्रांमध्ये आडवं आलं राजकारण...नितीशुकमारांना लालूंना फोनही करता येईना - bihar cm nitish kumar wishes for speedy recovery of lalu prasad yadav | Politics Marathi News - Sarkarnama

मित्रांमध्ये आडवं आलं राजकारण...नितीशुकमारांना लालूंना फोनही करता येईना

वृत्तसंस्था
रविवार, 24 जानेवारी 2021

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव हे एका गैरव्यवहार प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंतानजक आहे. त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) तातडीने हलवण्यात आले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आले आहे. मात्र, एकेकाळी लालूंचे घनिष्ठ मित्र असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना जुन्या मित्राच्या प्रकृतीची फोन करुनही चौकशीही करता येत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यांनीच उघडपणे ही खंत बोलून दाखवली आहे. 

लालू हे सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र, प्रकृती ढासळल्याने त्यांना रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (रीम्स) दाखल करण्यात आले होते. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे. लालूंची तब्येत काल (ता.23) आणखी ढासळल्याने त्यांना 'एम्स'मध्ये हलवण्याचा  निर्णय त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घेतला होता. त्यानंतर काल सायंकाळी लालूंना 'एम्स'मध्ये हलवण्यात आले. 

लालूंना 'एम्स'मधील 'कार्डिओथोरॅसिक अँड न्यूरोसायन्सेस सेंटर'च्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. लालूंसोबत त्यांच्या कन्या मिसा भारती या आहेत. लालूंना तेथे दाखल केल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. लालूंच्या पत्नी राबडी देवी आणि सहकारी भोला यादव यांच्या अनेक जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

लालूंच्या प्रकृतीबद्दल मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज चिंता व्यक्त केली. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी थेट फोन करता येत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले की, लालू लवकर बरे व्हावेत, अशी माझी इच्छा आहे. मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केलेला नाही मात्र, वृत्तपत्रातूनच मला याबद्दल माहिती मिळत आहे. माझी इच्छा असूनही मला त्यांना फोन करता येत नाही. ते 2018 मध्ये आजारी पडले होते त्यावेळी मी नेहमी त्यांना फोन करुन प्रकृतीची विचारपूस करायचो. मात्र, यावरुन त्यावेळी वेगळीच चर्चा सुरू झाली होती. यामुळे मला आता त्यांना फोन करता येत नाही.  

नितीशकुमार यांनी आरजेडी आणि काँग्रेसशी असलेली आघाडी 2017 मध्ये तोडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत आघाडी करीत सरकार स्थापन केले होते. 2018 मध्ये लालू आजारी पडल्यानंतर नितीश त्यांना सातत्याने फोन करीत होते. त्यावेळी भाजपवर नाराज असलेले नितीश पुन्हा एकदा आरजेडीला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करणार अशी चर्चा सुरू झाली होती. यावरुन मोठा गदारोळ झाला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख